तापाने फणफणत होतो, पण गोमूत्र पिऊन बरा झालो; आयआयटी मद्रासच्या संचालकांचा अजब दावा
आयआयटी मुंबईतून पासआऊट झालेल्या महाकुंभमधल्या आयआयटीयन बाबाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असताना आयआयटी मद्रासचे संचालकपदावर कार्यरत असलेले व्ही कामकोटी यांच्या एका दाव्याने खळबळ उडाली आहे. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओत ते म्हणतात की, मी एकदा तापाने फणफणत असताना गोमूत्र प्राशन केले. त्यानंतर मी लगेच बरा झालो. या व्हिडीओत ते गोमूत्राच्या औषधी गुणधर्मांचे कौतुक करताना दिसत आहेत. त्यांच्या या अजब दाव्यानंतर काँग्रेस व द्रमुक पक्षाच्या नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. कामकोटी यांचे वक्तव्य हे हास्यास्पद आहे, असे या नेत्यांनी म्हटले आहे. कामकोटी 15 जानेवारी 2025 रोजी मट्टू पोंगलच्या दिवशी ‘गो संरक्षण शाळे’त आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. तिथे त्यांनी देशी गायींचे संरक्षण करणे आणि सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याविषयी मार्गदर्शन केले. त्या वेळी बोलताना त्यांनी गोमूत्र पिऊन ताप दूर झाल्याचा दावा केला. आयआयटी मद्राससारख्या संस्थेच्या संचालकाने अशा प्रकारचे वक्तव्य करणे अनुचित आहे, असे सांगत काँग्रेस नेते कार्ती पी. चिदंबरम यांनीदेखील कामकोटी यांच्या वक्तव्याची निंदा केलीय.
वादग्रस्त विधानावर आक्षेप
कामकोटी यांनी जे काही दावे केले आहेत त्याबाबतचे पुरावेदेखील सादर करायला हवेत, अन्यथा त्यांनी माफी मागावी. त्यांनी माफी मागितली नाही तर आम्ही त्यांच्याविरोधात आंदोलन करू, असे के. रामकृष्णन यांनी सांगितले, तर कामकोटींचे वक्तव्य हास्यास्पद आहे. देशाची शिक्षण व्यवस्था बिघडवणे हेच केंद्र सरकारचे धोरण असल्याचे पाहायला मिळत आहे, असा गंभीर आरोप डीएमके नेते टी. के. एस. एलंगोवन यांनी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List