एलएलएम प्रवेशाकरिता 40 टक्क्यांची अट शिथिल करा! युवासेनेची कुलसचिवांकडे मागणी
मुंबई विद्यापीठाने एलएलएम अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व (सीईटी) परीक्षेत किमान 40 टक्के गुणांची ठेवलेली अट शिथिल करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, त्याचबरोबर या अभ्यासक्रमासाठी अनुदानित- विनाअनुदानित महाविद्यालये आकारत असलेल्या भरमसाट शुल्काला आळा घाला, अशी मागणी युवासेनेने मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांकडे केली आहे.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे अनेक विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांची भेट घेतली. मुंबई विद्यापीठ संलग्न अनेक महाविद्यालये ग्रामीण भागात आहेत तेथे विद्यार्थी मिळत नाहीत, मात्र सीईटीसाठी आवश्यक असलेल्या 40 टक्के गुणांमुळे तिथे विद्यार्थी मिळणे अधिकच कठीण होणार आहे. शिवाय कमी गुण मिळालेले विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्याने घेतलेल्या एलएलबी प्रवेशपूर्व परीक्षेत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यालादेखील प्रवेश घेण्यास प्राप्त ठरवले आहे. त्यामुळे 40 टक्क्यांची अट शिथिल करण्याची मागणी युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी कुलसचिवांना निवेदन देत केली.
भरमसाट शुल्काला आळा घाला!
एलएलएम अभ्यासक्रमाला विद्यापीठाच्या तुलनेत अनुदानित अथवा विनाअनुदानित महाविद्यालये भरमसाट शुल्क आकारत आहेत. तरी त्यावर निर्बंध आणून विद्यार्थ्यांचा प्रवेश सुकर करण्यासाठी पावले उचला, अशी मागणीही युवासेनेने केली. दरम्यान, या मागणीला कुलसचिवांनी सकारात्मक प्रतिसाद देत मागणीचे निवेदन पुढील कार्यवाहीसाठी पाठवले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List