सासूच्या ताब्यात असलेल्या दोन मुलींचा ताबा द्या, डेंटिस्ट आईची उच्च न्यायालयात धाव
पतीच्या मृत्यूनंतर सासूच्या ताब्यात असलेल्या दोघा अल्पवयीन मुलींचा ताबा मिळावा म्हणून डेंटिस्ट आईने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी तिने हायकोर्टात याचिका दाखल केली असून सासूने तिच्या याचिकेला आक्षेप घेतला आहे. न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या दालनात झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने आईला तूर्तास व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आपल्या मुलांना भेटण्याची परवानगी दिली आहे.
डेंटिस्ट महिला पती व दोन मुलींसह लोणावळा येथील फरीया रिसॉर्ट येथे गेली होती. त्यावेळी व्यावसायिक पतीचा हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. याप्रकरणी डेंटिस्ट पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तिला पोलिसांनी अटकदेखील केली. या काळात 13 व 7 वर्षांच्या मुलींचा ताबा जुलै 2024 मध्ये वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने आजीजवळ देण्याचे आदेश दिले. त्यानंतर डेंटिस्ट महिलेला जामीन मिळाला. आपल्या दोन्ही अल्पवयीन मुलींचा ताबा सासूकडे असल्याचे निदर्शनास येताच तिने याचिका दाखल केली, तर सासूने विरोध करत याचिका केली. न्यायालयाने सरकारी वकील कविता सोळुंके यांच्या उपस्थितीत आईला मुलींसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सवर संपर्क साधण्यास परवानगी दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List