विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीला फटका, तीन महिन्यांत 31 टक्क्यांची घट
ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 या कालावधीत मुंबईसह नवी मुंबई आणि ठाण्यातील गृहविक्रीत तब्बल 31 टक्क्यांची घट झाली. तसेच या कालावधीत नवीन प्रकल्पदेखील कमी झाले आहेत. प्रॉपटायगर डॉट कॉमच्या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. घरविक्रीत घट होण्यामागचे कारण प्रामुख्याने राज्यात झालेली विधानसभा निवडणूक तसेच मालमत्तेच्या वाढत्या किमती असल्याचे प्रॉपटायगरच्या अहवालात नमूद आहे. तसेच राज्यातील निवडणुकीमुळे प्रकल्प मंजुरीची प्रक्रिया मंदावली होती, असेही या अहवालात म्हटले आहे.
अहवालात समाविष्ट आठ शहरांपैकी फक्त दिल्ली एनसीआरमध्ये नवीन घरांच्या विक्रीत सकारात्मक वृद्धी नोंदवली. येथे ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत 9808 इतकी नवीन घरे विकली गेली. गतवर्षी हाच आकडा 6528 एवढा होता. 33,617 घरांच्या विक्रीसह एमएमआरने मार्पेट लीडर म्हणून आपले स्थान कायम राखले. परंतु गेल्या वर्षी हा आकडा 48,553 होता. म्हणजेच यात 31 टक्के वार्षिक घट झाली. त्यापाठोपाठ पुण्यात 18,240 घरे तर बंगळुरूत 13,236 घरे विकली गेली. येथे अनुक्रमे 31 टक्के आणि 23 टक्के घट झाली. हैदराबादेत 13,179 तर चेन्नईत 4073 घरांच्या विक्रीची नोंद झाली आहे.
नवीन प्रकल्पाच्या लाँचिंगमध्ये दिल्ली, चेन्नई आघाडीवर
नवीन घरांच्या लाँचिंगमध्ये सर्वाधिक वार्षिक 66 टक्के घट हैदराबादमध्ये झाली असून या तिमाहीत केवळ 9066 घरे लाँच झाली. यापाठोपाठ अहमदाबाद 3515 घरे आणि कोलकाता येथे 3091 घरे लाँच झाली. येथे अनुक्रमे 61 टक्के आणि 41 टक्के घट पाहायला मिलाली. दुसरीकडे दिल्ली एनसीआरमध्ये 10048 घरांच्या लाँचिंगसह वार्षिक 133 टक्के वाढ झाली. चेन्नई येथे 4005 घरांसह 34 टक्के तर बंगळुरू येथे 20 टक्के वाढीसह 15157 घरे लाँच झाली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List