Saif Ali Khan Attack: सैफवर हल्ला करणारा आरोपी पैलवान, बांगलादेशात राष्ट्रीय स्तरावर खेळायचा कुस्ती
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफ शहजादला रविवारी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. यावेळी तपासादरम्यान अनेक गोष्टींचा खुलासा झाला. आरोपी मोहम्मद शरीफ शहजाद हा बांगलादेशचा रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. अशातच आता आणखी मोठी माहिती समोर येत आहे. आरोपी शहजाद हा बांगलादेशीतील राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शहजाद राष्ट्रीय स्तरावचा कुस्तीपटू आहे. त्याने बांगलादेशात अनेक कुस्ती स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. बांगलादेशात तो कमी वजनी गटात कुस्ती खेळत होता. मात्र बांगलादेशात त्याला कुठेच नोकरी मिळत नव्हती. तो बेरोजगार झाल्यामुळे त्याने हिंदुस्थानात येण्याचा निर्णय घेतला. गेली सात वर्ष शहजाद हिंदुस्थानात बेकायदेशीरपणे राहत होता. पोलिसांनी त्याची कोठडी मागताना सैफवरील हल्ला आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असल्याची शक्यता वर्तवली. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपीने काय काय केले?
चार दिवसांपूर्वी सैफ अली खानवर त्याच्याच घरात घुसून प्राणघातक हल्ला झाला होता. यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला. सध्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सैफवरील हल्ल्यानंतर आरोपीने तेथून पळ काढला. यानंतर त्यांनी थोडा वेळ निवांत झोप घेतली. झोप झाल्यावर तो वांद्रे स्थानकावर गेला. तिथे त्याने कपडे बदलले आणि दादर स्थानकावर गेला. यानंतर दादरहून तो पुन्हा वरळीला गेला. वरळीवरुन पुन्हा ठाण्याला गेला. ही माहिती स्वत: आरोपीने पोलिसांना सांगितली आहे.
अनेक सेलिब्रेटींच्या घरांची रेकी
सैफ अली खानच्या घरात जाण्यापूर्वी आरोपीने अनेक कलाकारांच्या घराची रेकी केली होती. शाहरुख खान, सलमान खान यांच्या घरातही चोरी करण्याच्या उद्देशाने आरोपी शहजाद याने रेकी केल्याची माहिती मिळत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List