रेव्ह पार्टीवर ठाणे पोलिसांचा ड्रोन वॉच, निसर्गरम्य स्पॉट, ढाबे, फॉर्महाऊसवर धाड टाकणार
नववर्षाच्या पाश्र्वभूमीवर ठाण्याच्या खाडीलगत तसेच निर्जनस्थळी होणाऱ्या रेव्ह पार्टीवर पोलिसांचा यंदा ड्रोन वॉच असणार आहे. तसेच एखाद्या हॉटेल किंवा उच्चभ्रू वस्तीतील होणाऱ्या अमली पदार्थांच्या पार्टीवर पोलीस बारीक लक्ष ठेवणार आहेत. यासाठी ठाणे गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली असून पोलीस आयुक्त ठाणे शहर आणि पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची तुकडी सज्ज ठेवण्यात आली आहे. दरम्यान येऊर, उपवन, घोडबंदर तसेच ग्रामीण भागातील निसर्गरम्य ठिकाणे, ढाबे तसेच फॉर्महाऊसवर वेळ पडल्यास धाड टाकली जाणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाचे स्वागत करताना कोणतीही हुल्लडबाजी सहन केली जाणार नसल्याचा इशारा ठाणे पोलिसांनी दिला आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांच्या आनंदात विरजण पडू नये व कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. शहर आणि ग्रामीण मिळून तब्बल 7 हजार 500 पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार असून 500 हून अधिक वाहतूक पोलीस ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह रोखण्यासाठी 31 डिसेंबरच्या रात्री सज्ज असणार आहेत.
जाहिरातींवर लक्ष
रेव्ह पार्टीच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित होणाऱ्या जाहिरातींवर लक्ष ठेवले आहे. पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नागरिकांनी नवीन वर्ष आनंदात साजरे करावे आणि मद्यप्राशन करून स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाला धोका पोहोचू नये, असे पोलीस सहआयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले.
खाडीजवळ खडा पहारा
मागील नववर्षाच्या एक दिवस आधीच ठाण्याच्या कासारवडवली खाडीलगत निर्जनस्थळी आयोजित केलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली होती. गुन्हे शाखा युनिट – 5 च्या पथकाने मध्यरात्रीनंतर छापेमारी करीत 8 लाख 3 हजारांचे अमली पदार्थ जप्त करीत ड्रग्ज घेऊन धुंद झालेल्या 90 पुरुष आणि 5 महिला तसेच रेव्ह पार्टी आयोजन करणाऱ्यासह 97 जणांना अटक केली होती. दरम्यान या पार्टीची राज्यभर जोरदार चर्चा झाली असताना यंदा ठाणे पोलिसांनी खडा पहारा ठेवला आहे. तसेच कोणतेही अमली पदार्थ विकी, सेवन अथवा रेव्ह पार्टी करीत असल्याबाबत माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List