देवा तुझी सोन्याची जेजुरी… तिथे नांदतो माझा देव मल्हारी! ‘सदानंदाचा येळकोट’ च्या जयघोषाने खंडोबागड दुमदुमला
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र जेजुरी येथील श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेस सुमारे चार लाख भाविकांनी हजेरी लावली. रविवारपासूनच भाविकांच्या गर्दीने जेजुरीनगरी फुलून गेली. नाताळच्या सुट्टी आणि मार्गशीर्ष महिन्यात आलेल्या सोमवती यात्रेमुळे जेजुरीला अपेक्षेपेक्षा जादा गर्दी झाली. मुंबईहून हजारोंच्या संख्येने कोळी व आगरी बांधव जेजुरीत यात्रेसाठी मुक्कामी आले होते. सोमवारी दुपारी एक वाजता घडशी समाजातील मानकऱ्यांनी सनई-ढोल वाजवून पालखीला शेडा दिला. इनामदार पेशव्यांनी सूचना करताच खांदेकऱ्यांनी पालखी उचलून खांद्यावर घेतली.
मंदिरप्रदक्षिणा मारून पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखी कहा नदीवर स्नानासाठी निघाली. यावेळी गुरव पुजाऱ्यांनी देवाच्या मूर्ती पालखीमध्ये आणून ठेवल्या. यावेळी भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला. ‘सदानंदाचा येळकोट,’ ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ असा जयघोष करीत भाविकांनी भंडाऱ्यांची प्रचंड उधळण केल्याने सारा गड पिवळाधमक झाला. ‘देवा तुझी सोन्याची जेजुरी…’ या उक्तीचा साऱ्यांनाच अनुभव आला. गडावर भाविकांची प्रचंड गर्दी झाली. पालखी गडाबाहेर गेल्यानंतरही बाहेर पडताना भाविकांमध्ये चेंगराचेंगरी होत होती. श्री मार्तंड देवस्थानने यात्रेसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन योग्य नियोजन केले होते.
खंडोबाची पालखी वाजतगाजत गडावरून खाली आणण्यात आली. छत्री देऊळ येथे भेटून पालखी सायंकाळी कन्हा नदीवर पोहोचली. तेथे धार्मिक वातावरणामध्ये पालखीमधील खंडोबा आणि म्हाळसादेवी या मूतींना कहास्नान घालण्यात आले. यावेळी कऱ्हा नदीवर हजारो भाविक उपस्थित होते. तसेच यावेळी अनेक भाविकांनी स्नान केले. यंदा नदीला भरपूर पाणी असल्याने दुर्घटना टाळण्यासाठी बोटी व जीवरक्षक पथक नेमण्यात आले असल्याची माहिती मुख्य विश्वस्त अभिजित देवकाते यांनी दिली. सायंकाळी रात्री उशिरा पालखी खंडोबा गडावर आल्यावर रोजमोरा (ज्वारी धान्य) वाटून पालखी सोहळ्याची सांगता झाली.
यावेळी देवस्थानचे मुख्य विश्वस्त अभिजित देवकाते, विश्वस्त अॅड. पांडुरंग थोरवे, डॉ. राजेंद्र खेडेकर, मंगेश घोणे, अॅड. विश्वास पानसे, अनिल सौंदाड, पोपट खोमणे गडावर उपस्थित होते.
यात्रेनिमित्त जेजुरीत भंडारा-खोबरे, दिवटी-बुधली, देवांचे चांदीचे टाक, पितळी मूर्ती, फोटो यांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. तसेच खंडोबाचे मूळ स्थान असलेल्या कडेपठारच्या डोंगरातही हजारो भाविकांनी जाऊन देवदर्शन घेतले. पुढील वर्षी 2025मध्ये एकही सोमवती यात्रा नसल्याने भाविकांनी या यात्रेसाठी प्रचंड गर्दी केली होती.
अतिक्रमणे काढल्याने चालणे झाले सुलभ
जेजुरी गावातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली होती. भाविकांना रस्त्याने चालता येत नसल्याने तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी नगरपालिका व पोलीस प्रशासनाने मुख्य रस्ता व खंडोबाच्या पायथ्याशी असणारी अतिक्रमणे काढल्याने भाविकांना रस्त्याने चालणे सुलभ झाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List