वयाच्या 51 व्या वर्षी फरहान अख्तर तिसऱ्यांदा बनणार बाबा? शिवानी दांडेकर गरोदर?
अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी 2022 मध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं. आता लग्नाच्या तीन वर्षांनंतर हे दोघं आई-बाबा बनणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. शिबानीसोबत फरहानचं हे दुसरं लग्न आहे. याआधी त्याने हेअर स्टायलिस्ट अधुना भबानीशी पहिलं लग्न केलं होतं. फरहान आणि अधुना यांना दोन मुली असून त्यांची नावं शाक्य आणि अकिरा अशी आहेत. 16 वर्षांच्या संसारानंतर फरहान आणि अधुनाने घटस्फोट घेतला होता. आता वयाच्या 51 व्या वर्षी फरहान तिसऱ्यांदा बाबा बनणार असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चांवर फरहानची सावत्र आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी मौन सोडलं आहे.
एप्रिल 2017 मध्ये फरहानने अधुनाला घटस्फोट दिला. त्यानंतर इन्स्टाग्राम डीएमद्वारे (डायरेक्ट मेसेज) फरहान आणि शिबानी यांनी पहिल्यांदा एकमेकांशी संवाद साधला. या संवादाचं रुपांतर हळूहळू मैत्रीत आणि नंतर प्रेमात झालं. 9 जानेवारी 2025 रोजी फरहानने त्याचा 51 वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवशीच शिबानीच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण आलं. 2025 या नवीन वर्षात शिबानी तिच्या बाळाला जन्म देणार असल्याचं म्हटलं गेलं. या सर्व चर्चांवर शबाना आझमी यांनी ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे. या मुलाखतीत शबाना यांना शिबानीच्या प्रेग्नंसीबाबत प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, “त्यात काही सत्य नाही.” या उत्तराने शबाना आझमी यांनी फरहान आणि शिबानी लवकरच आई-बाबा होणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
काही दिवसांपूर्वी फरहानने अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या युट्यूब चॅनलसाठी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तो त्याच्या घटस्फोटाविषयी आणि त्याचा मुलींवर कसा परिणाम झाला याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला होता. “घटस्फोट पचवणं कोणासाठीच सोपं नसतं. कारण अखेर जे नातं त्यांना खूप पक्कं आणि परफेक्ट वाटत असतं, त्यालाच तडा जातो. त्यामुळे काही अंशी मनात राग, नाराजी असतेच. मला आजही माझ्या मुलींमध्ये काही अंशी राग किंवा नाराजी असल्याचं जाणवतं. पण त्या दोघी मोकळेपणे व्यक्त करत नाहीत. ही गोष्ट वेळेबरोबरच ठीक होऊ शकते. वेळ आणि संवाद या दोन गोष्टींमुळे परिस्थिती काही प्रमाणात सुधारू शकते”, असं तो म्हणाला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List