दिल्ली निवडणूक बहाणा, कुणीही जिंकले तरी सरकार मोदी-शहाच चालवतील; संजय राऊत यांचा निशाणा
देशात काँग्रेस, तर दिल्लीत आम आदमी पार्टी मोठा पक्ष आहे. दिल्लीत आप आणि अरविंद केजरीवाल यांची ताकद सर्वाधिक आहे. तिथे आप पुन्हा सत्तेत येईल असे वातावरण आहे. काँग्रेस आणि आप आघाडीचा भाग आहे. इंडिया आघाडीचे नेतृत्व काँग्रेस करत आहे. पण केजरीवाल सारख्या नेत्यांना देशद्रोही बोलणे, तसे कॅम्पेन चालवणे याच्याशी आम्ही सहमत नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत गुरुवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले.
लोकसभेत आम्ही एकत्र लढलो. पण दिल्ली विधानसभेची स्थिती वेगळी आहे. दिल्ली केंद्रशासित प्रदेश असून तिथे कुणीही जिंकले तरी नायब राज्यपाल किंवा मोदी, शहाच सरकार चालवतील. निवडणूक हा बहाणा असून हे कुणाला काम करू देणार नाहीत. पण काँग्रेस आणि आप एकत्र लढले असते तर आम्हाला आनंद झाला असता, असेही राऊत यावेळी म्हणाले.
दिल्लीत आप आणि काँग्रेस एकत्र लढले असते तर अधिक चांगला निकाल मिळू शकेल अशी स्थिती असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. पण दुर्दैवाने महानगरपालिका, नगरपंचायत किंवा दिल्लीसारख्या लहान विधानसभा निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांच्या दबावामुळे या गोष्टी शक्य होत नाहीत. दिल्ली विधानसभेच्या बाबतीत जे घडले ते उद्या कदाचित मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत होऊ शकते. कारण विधानसभेच्या खालच्या ज्या लहान निवडणुका असतात तिथे कार्यकर्त्यांचे मनोबल राखण्यासाठी जास्तीत जास्त जागा लढणे आवश्यक असते, असे राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, इंडिया आघाडी इतिहासजमा झाली या तेजस्वी यादव यांच्या विधानाशी मी सहमत नाही. लोकसभा आणि राज्यसभेत आम्ही आजही इंडिया आघाडी म्हणूनच काम करतो. लोकसभा निवडणूक येईल तेव्हाही आम्ही आघाडी म्हणून काम करू. बिहारमध्ये विधानसभा निवडणुका येतील तेव्हा तेजस्वी यादव जेडीयू किंवा भाजपशी नाही तर काँग्रेसशी हातमिळवणी करेल. अर्थात या जर तर याच्या गोष्टी असून आता भाजप आणि एनडीए विरोधात उभे राहण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची भक्कम एकजूट आवश्यक आहे. अन्यथा मोदी, शहा आणि त्यांचा भस्मासूर पक्ष सर्वांना खाऊन टाकेल.
दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा; 5 फेब्रुवारीला मतदान, 8 तारखेला निकाल
5 फेब्रुवारीला मतदान, 8 तारखेला निकाल
दिल्ली विधानसभेच्या एकूण 70 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या विधानसभा निवडणुकीची अधिसूचना 10 जानेवारी रोजी निघणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी आहे. उमेदवारी अर्जांची छाननी करण्याची तारीख 18 जानेवारी आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी असेल. त्याचप्रमाणे 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर 8 फेब्रुवारीला मतमोजणी होत निकाल जाहीर होणार आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List