अभिनेत्रीने लेकींसाठी सोडली मायानगरी; मुंबईपासून दूर ‘या’ ठिकाणी करतेय संगोपन, सांगितलं खास कारण
‘छोटी बहु’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रुबिना दिलैकने 2023 मध्ये जुळ्या मुलींना जन्म दिला. जीवा आणि ईधा अशी तिच्या मुलींची नावं आहेत. नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये रुबिनाने तिच्या खासगी आयुष्याविषयी मोठा खुलासा केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत राहणाऱ्या रुबिनाने तिच्या जुळ्या मुलींसाठी चक्क हे शहर सोडलंय. यात पती अभिनव शुक्लानेही तिची पूर्ण साथ दिली आहे. पारस छाब्राच्या या पॉडकास्टमध्ये रुबिनाने सांगितलं की, गेल्या काही महिन्यांपासून ती हिमाचल प्रदेश याठिकाणी राहत आहे. रुबिना मूळची तिथलीच असल्याने गावातल्या स्वच्छ आणि सुंदर वातावरणात मुलींचं संगोपन करण्यासाठी तिने हा मोठा निर्णय घेतला आहे.
याविषयी ती म्हणाली, “मी आणि अभिनव याबाबत खूप स्पष्ट होतो की आम्हाला आमच्या दोन्ही मुलींना चांगल्या वातावरणात मोठं करायचं आहे. म्हणूनच आम्ही बेबी प्लॅनिंग करत होतो, तेव्हापासूनच हे ठरवलं होतं की आपल्या मुलांचं संगोपन कशा पद्धतीने करायचं? आमची मुलं मातीश, जमिनीशी जोडून राहावीत, त्यांना गावाकडील आयुष्य जगता यावं, पाहता यावं.. अशी आमची इच्छा होती. आम्हाला त्यांना स्वच्छ वातावरण द्यायचं होतं. त्यांनी मातीत खेळावं, चांगल्या ठिकाणी मोठं व्हावं आणि जितकं शक्य होईल तितकं गावाशी जोडून राहावं, स्वत:च्या शेतात उगवणऱ्या ताज्या भाज्या, फळं त्यांनी खावीत, यामुळे आम्ही हा निर्णय घेतला.”
रुबिना स्वत: हिमाचल प्रदेशची असल्याने तिने गावीच मुलींना लहानाचं मोठं करायचं ठरवलंय. म्हणूनच मुलींच्या जन्मानंतर दोन-तीन महिन्यांनी रुबिना आणि अभिनव हिमाचलला राहायला गेले. फक्त कामानिमित्त दोघं मुंबईला येतात. “मी अद्याप माझ्या मुलींना मीठ आणि साखरेची चव चाखू दिली नाही”, असाही खुलासा रुबिनाने केला. तिच्या सोशल मीडियावर हिमाचल प्रदेशचे बरेच व्हिडीओसुद्धा पहायला मिळतात. अभिनव त्याच्या हिमाचल प्रदेशातील फार्महाऊसमध्ये पत्नी आणि दोन मुलींसोबत राहतोय.
रुबिनाने 21 जून 2018 रोजी अभिनेता अभिनव शुक्लाशी लग्न केलं. या दोघांनी ‘बिग बॉस 14’मध्ये खासगी आयुष्यातील चढ-उतारांचा खुलासा केला होता. “शोमध्ये जाण्यापूर्वी आम्ही घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत पोहोचलो होतो. इतकंच नव्हे तर घटस्फोटाआधी आम्ही एकमेकांना सहा महिन्यांचा वेळ दिला होता. मात्र बिग बॉस या शोने आम्हाला पुन्हा एकत्र आणलं,” असं ती म्हणाली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List