रोहेकरांच्या जलवाहिनीवर बेकायदा ढाबा, राजकीय वरदहस्तामुळे कारवाईस टाळाटाळ
राज्यमार्गापासून 50 मीटरपर्यंत कोणतेही व्यावसायिक बांधकाम करण्यास सक्त मनाई आहे. मात्र मुरुड-रोहा-कोलाड या मुख्य राज्य मार्गावर अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याने बेकायदा ढाबा उभारला आहे. धक्कादायक म्हणजे रोहे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकमेव जलवाहिनीवरच हे बांधकाम केले गेले आहे. याबाबत अनेकदा नागरिकांनी तक्रारी करूनही राजकीय वरदहस्तामुळे या ढाब्यावर कारवाई करण्यास चालढकलपणा केला जात आहे. त्यामुळे नगर परिषदेने ढाबा मालकाला नोटीस बजावली असली तरी कारवाई होणार का, याकडे रोहेकरांचे लक्ष लागले आहे.
मुरुड-रोहा-कोलाड या मुख्य राज्य मार्गावर हे बेकायदा हॉटेल बांधण्यात आले आहेत. शासन निर्णयानुसार मुख्य राज्य मार्गावर रस्त्यापासून 50 मीटर अंतरापर्यंत कुठल्याही प्रकारचे व्यावसायिक बांधकाम उभारण्यास मनाई आहे. असे असताना ढाबामालकाने शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून रस्त्यावरच बांधकाम केले आहे. गंभीर बाब म्हणजे डोलवहाळ धरणातून रोहा शहराला पाणीपुरवठा करणारी एकमेव आणि मुख्य पाइपलाइन याच रस्त्याच्या बाजूने जाते. मात्र ही पाइपलाइनसुद्धा ढाबा बांधकाम आणि भरावाखाली गाडली गेली आहे.
बांधकामाच्या वजनामुळे पाइपलाइनमधून गळती झाल्यास रोहा शहरात पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बांधकामाच्या सवाशे फूट लांबीच्या क्षेत्रात पाइपलाइन गाडली गेली असल्याने तिची डागडुजी करणेसुद्धा शक्य नाही. रोहा नगर पालिका प्रशासनाने प्रसंगाचे गांभीर्य ओळखून या बांधकामाचे सर्वेक्षण करून नोटीस बजावली आहे.
रस्त्याला पडले होते भगदाड
बांधकामामुळे पावसाळी पाण्याचा निचरा होऊ न शकल्याने रोहा कोलाड रस्त्याला भलेमोठे भगदाड पडले होते. त्यावेळी वाहतूक बंद झाली होती. बांधकाम विभागाने त्यावेळी ढाबामालकाला नोटीस बजावली. मात्र ठोस कारवाई झाली नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List