मालोजीराजे भोसले यांच्या स्मारकाची दुरावस्था, स्मारकाकडे दुर्लक्ष करून पुलाचे काम रेटून नेण्याचा प्रयत्न
काटेरी झुडपे, धुळीने माखलेले पुतळे, उड्डाणपुलाच्या कामामुळे खचत चाललेला स्मारकालगतचा भाग… अशी अवस्था वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या स्मारकाची झाली आहे. मात्र, याकडे ठेकेदाराने पूर्णच दुर्लक्ष केल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
स्मारकाची सर्वतोपरी काळजी घेतली जाईल, अशी हमी घेतलेल्या एन.पी. इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. या उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या कंपनीने दिलेला शब्द गुंडाळून ठेवत पुलाचे काम रेटून नेण्याचा प्रयत्न चालवला आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वीरश्री मालोजीराजे यांच्या नावाचा चौक आहे. शासनाने याठिकाणी वीरश्री मालोजीराजे यांचे स्मारक उभारलेले आहे. सुंदर सजवलेला मानदार वर्तुळाकार कट्टा, त्याच्या शेजारी मधोमध मालोजीराजे यांची मुद्रा असणारा लांब-रुंद चौथरा, त्याच्या सभोवती मावळ्यांच्या प्रतिकृती अशी सजावट असणारे स्मारक व भोवती असणारी फुलझाडे यामुळे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून मुंबई ते हैदराबादपर्यंत जाणाऱ्या लोकांच्या दृष्टीला हे स्मारक सुखावून जात होते.
महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू झाले, त्यावेळी स्मारकाच्या दक्षिणेकडून उड्डाणपूल काढण्याचे ठरले. एन.पी. इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. या कंपनीकडे उड्डाणपूल उभारणीचे काम देण्यात आले. काम सुरू केल्यानंतर स्मारकाच्या भोवतालच्या जमिनीची खोदाई सुरू झाली. स्मारकाचा परिसर धुळीने माखला. सकल मराठा समाजाने ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
“ठेकेदार कंपनीच्या बेपर्वा वृत्तीमुळे छत्रपती शिवराय यांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या स्मारकाची दुरवस्था झाली आहे. या संदर्भात आम्ही शासनाकडे वेळोवेळी निवेदने देत आहोत. आंदोलने करत आहोत. परंतु, जैसे थे अशीच परिस्थिती आहे. यात सुधारणा झाली नाही, तर स्मारकाच्या संवर्धनासाठी आक्रमक व्हावे लागेल.
रोहित पाटील, सकल मराठा समाज, इंदापूर.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List