चिमुरडीची चर्चमधील प्रार्थना ठरली अखेरची ! हडपसरमध्ये ट्रकने चिरडले
चर्चमध्ये प्रार्थना केल्यानंतर आईसोबत दुचाकीवर घरी परतणाऱ्या चिमुरडीला ट्रकचालकाच्या चुकीमुळे जीव गमवावा लागला आहे. भरधाव ट्रकचालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिलेसह तिची दोन्ही मुले खाली पडली. ट्रकचे चाक मुलीच्या डोक्यावरून गेल्यामुळे आईच्या डोळ्यासमोर 9 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला. ही घटना 15 जानेवारीला रात्री सव्वा नऊच्या सुमारास हडपसरमधील भोसले गार्डनसमोर घडली. अपघातात महिलाही जखमी झाली असून, ट्रकचालकाला अटक केल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली आहे.
निशा प्रल्हादकुमार शर्मा (वय 9,रा. फुरसुंगी, हडपसर) असे मृत मुलीचे नाव आहे. संध्याकुमारी शर्मा (वय 30) असे जखमी महिलेचे नाव असून, त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. नीलेश बाबासाहेब बटुळे (वय 25, रा. अहिल्यानगर) असेट्रकचालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकुमारी आणि त्यांची मुलगी निशा, मुलगा शिवांशू शर्मा हे 15 जानेवारीला संध्याकाळी आठच्या सुमारास घोरपडीतील चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गेले होते. त्याठिकाणी प्रार्थना संपल्यानंतर तिघेही माय-लेकरे दुचाकीवरून फुरसुंगीला घरी जात होते. सव्वानऊच्या सुमारास संध्याराणी दुचाकीवरून भोसले गार्डनसमोरून जात होत्या. त्यावेळी पाठीमागून भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे तिघेही खाली पडल्यानंतर 9 वर्षीय निशाच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेले. आईच्या डोळ्यांदेखतच निशाचा जीव गेल्यामुळे तिने हंबरडा फोडला. अपघातात संध्याराणीही जखमी झाल्या आहेत. दरम्यान, पसार होण्याच्या तयारीतील चालक नीलेशला पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगर तपास करीत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List