प्रदीपच्या हत्येचा उलगडा; पैशांसाठी मावसभावाचा खून!
ऑनलाईन गेमिंगमध्ये जिंकलेल्या 1 लाख रुपयांपैकी 65 हजार रुपये प्रदीप निपटे याने हरवले होते. हे पैसे परत करण्याच्या वादातून अल्पवयीन मावसभावानेच प्रदीपची निघृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आला आहे. रुमपार्टनर म्हणून राहणाऱ्या याच मावसभावाने तपास भरकटविण्यासाठी पोलिसांना खोटी माहिती दिल्याचे उघड झाले आहे.
गुरुगोविंदसिंगपुरा भागात तीन दिवसापूर्वी बीसीएसचे शिक्षण घेणारा महाविद्यालयीन तरुण प्रदीप निपटे याची निघृण हत्या झाल्याचे 14 जानेवारी रोजी रात्री उशीरा उघडकीस आले होते. या खुनाच्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या खुनाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी 8 पथके तयार केली होती. पोलिसांनी या खुनाचा सर्वच बाजूने तपास सुरू केला होता. पोलीस निरीक्षक येरमे यांचा रुमपार्टनरवर संशय बळावला होता. त्यामुळे प्रदीपच्या मावसभावाला पोलिसांनी वारंवार चौकशीला बोलावले होते. त्याने पोलिसांचा तपास भरकटवण्यासाठी प्रदीपची कॉलर उडवण्यावरुन कॉलेजमध्ये भांडण झाल्याचे सांगत त्यांनीच खून केल्याची माहिती आरोपी अल्पवयीन मावसभाऊ पोलिसांना देत होता. त्यामुळे पोलिसांनी देखील त्या दिशेने तपास सुरु केला. त्यात मावसभाऊ वारंवार त्याचा जबाब वारंवार बदलत असल्याने पोलिसांचा संशय त्याच्यावर बळावला. त्यामुळे पोलिसांनी त्याला विश्वासात घेत चौकशी केली असता त्याने गुन्हा कबुल केला.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, सहायक पोलीस आयुक्त रणजित पाटील, पोलीस निरीक्षक अतुल येरमे, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी चौरे, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण वाघ, एमआयडीसी सिडकोचे पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे, मुकुंदवाडीचे उपनिरीक्षक संतोष राऊत, साताऱ्याचे उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे, सिडकोचे सुभाष शेवाळे आदींच्या पथकाने केली.
ऑनलाईन गेमिंगचा आयडी घेऊन प्रदीप हरला होता पैसे
प्रदीप निपटेचा रुमपार्टनर मावसभावाचा मोबाईल खराब होता. त्यामुळे तो प्रदीपच्या मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळत होता. तो ऑनलाईन गेम खेळण्यात पटाईत असल्याने त्याने त्यातून 1 लाख रुपये जिंकले होते. प्रदीप देखील हा ऑनलाईन गेम खेळत होता. मात्र, तो आरोपीप्रमाणे सराईत नव्हता. आरोपी मावसभावाने या गेमिंगमधून १ लाख रुपये जिंकले होते. त्यापैकी 65 हजार रुपये प्रदीप हा मावसभावाचा आयडी वापरून गेम खेळल्याने हरला होता. या हरलेल्या पैशावरून दोघांमध्ये वाद झाला होता. हत्या झाल्याच्या दिवशीदेखील त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर सायंकाळी सहा ते साडेसहा दरम्यान रागाच्या भरात तीक्ष्ण हत्याराने प्रदीपवर 17 वार करुन त्याची निघृण हत्या केली. या झटापटीत आरोपी मावसभावाच्या करंगळीला देखील मार लागला होता. अखेर पोलिसांच्या रडारवर आल्यानंतर त्याने हत्येची कबुली दिली.
न्यायालयास पत्र देणार
प्रदीपची निघृण हत्या करणाऱ्या मावसभावाला सज्ञान समजावे यासाठी जिल्हा न्यायालयाला पत्र देणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List