बीडमध्ये माणसाच्या जिवाची किंमत मातीमोल! दोन भावांना मारून रस्त्यावर फेकले, तिसरा भाऊ गंभीर जखमी
बीडमध्ये माणसाच्या जिवाची किंमत मातीमोल झाल्याचे दिसून येत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना अतिशय अमानुष पद्धतीने हाल हाल करून मारण्यात आले. आता आष्टीत जुन्या वादातून तीन सख्ख्या भावांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. दोघा भावांना मारून रस्त्यावर फेकून देण्यात आले. तिसरा भाऊ गंभीर जखमी असून अहिल्यानगरच्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. पोलिसांनी या प्रकरणी सात संशयितांना ताब्यात घेतले आहे.
बीड जिल्ह्यातील गुंडगिरीला वेसण घालण्यात पोलीस सपशेल अपयशी ठरले आहेत. गावागावात कंबरेला रिव्हॉल्वर लटकावून फिरणारे तरूण, सोशल मीडियावर रील टाकून ‘वाप तो बाप है’ असे विषारी विचार पेरणारे स्वयंघोषित गल्ली लिडर्सची बीडमध्ये वाणवाच नाही! पवनचक्कीच्या वादातून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना अशाच टोळीने हाल हाल करून मारले. त्याचे व्रण अद्याप ताजे असतानाच आष्टी तालुक्यातील सख्ख्या भावंडांच्या हत्याकांडाने जिल्हा हादरून गेला आहे.
आष्टी तालुक्यातील हातोळणा येथील अजय विलास भोसले (30), भरत विलास भोसले (35), कृष्णा विलास भोसले हे तिघे सख्खे भाऊ वाहिरा गावी आले होते. दुपारपासून त्यांच्यात कुरबुर सुरू होती. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास गावातील आणि बाहेरून आलेल्या सात ते आठ जणांनी तिघा भावांवर लोखंडी रॉड आणि दगडाने हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये अजय आणि भरत या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तिसरा कृष्णा हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी अहिल्यानगर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. हल्लेखोरांनी एकाचा मृतदेह रस्त्यावर तर दुसरा मृतदेह खड्यात फेकून दिला.
हत्याकांडाची माहिती मिळताच अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे, बाबासाहेब गर्जे, भरत माने, बाबूराव तांदळे, लुईस पवार, दत्तात्रय टकले, पोलीस अंमलदार शिवदास केदार, सतीश पैठणे, अमोल सिरसाट आदींनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह आष्टी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. जखमी कृष्णा याला अहिल्यानगरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी सात संशयितांना ताब्यात घेतले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List