सैफवर हल्ला करणारा अजूनही मोकाटच, 30हून अधिक पथके घेताहेत शोध
अभिनेता सैफ अली खान याच्यावर जीवघेणा हल्ला होऊन दोन दिवस उलटले तरी हल्लेखोराला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी आज दिवसभरात तीन जणांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. मात्र या चौकशीत काहीही निष्पन्न झाले नाही. हल्लेखोर वांद्रे परिसरातील असावा या अंदाजाने पोलिसांनी दिवसभर परिसर पिंजून काढला. मात्र हल्लेखोर काही सापडला नाही. रात्री उशिरा आणखी एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
गुरुवारी पहाटेच्या सुमारास उच्चभ्रू वस्तीत राहणाऱया सैफअली खान याच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सैफच्या नर्सने दिलेल्या फिर्यादीवरून वांद्रे पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंद केला आहे. यानंतर तपासासाठी स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या 30 हून जास्त टीम तयार केल्या आहेत. ही हायप्रोफाईल केस असल्याने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी हे युनिट 9 च्या कार्यालयात बसून आढावा घेत आहेत. तर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त आणि गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक यांचे पथक हे वांद्रे पश्चिम परिसरात फिरत होते. मात्र हल्ल्याच्या घटनेला दोन दिवस उलटून गेल्यानंतर देखील हल्लेखोर पोलिसांच्या हाती अद्याप लागलेला नाही.
स्पष्ट फुटेज नसल्याने पोलिसांची गोची
पोलिसांना हल्ल्याच्या दिवशीच्या पहाटेचे काही ठिकाणचे फुटेज देखील स्पष्ट मिळालेले नसल्याने तपासात अडचणी येत आहेत. तरीही पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू ठेवली आहे. काही दिवसापूर्वी सैफअली याच्या घरी सुतार काम झाले होते, त्या सुतार काम करणाऱ्याची देखील पोलिसांनी चौकशी केली. वारीस सलमानी असे त्याचे नाव आहे. त्याची चौकशी करून पोलिसांनी त्याला दुपारी सोडून दिले. तसेच पोलिसांनी सैफच्या घरात राहणाऱ्या नोकर चाकर याचे देखील जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे.
पोलिसांनी नोंदवला करिना कपूरचा जबाब
आज वांद्रे पोलिसांनी अभिनेत्री करिनाचा जबाब नोंदवला. वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी हे जबाब नोंदवण्यासाठी गेल्याचे सूत्रांनी सांगितले. हल्ला प्रकरणात करिना कपूर या प्रत्यक्षदर्शी असल्याने तिचा जबाब हा महत्त्वाचा मानला जातो.
रिक्षाचालकाने सांगितले त्या रात्री काय घडले?
त्या रात्री नेमके काय घडले याबाबत रिक्षाचालकाने सांगितले. भजन सिंह राणा असे रिक्षाचालकाचे नाव आहे. रक्तबंबाळ अवस्थेत रिक्षात बसल्यानंतर रुग्णालयात पोहोचण्यास किती वेळ लागेल असा प्रश्न सैफने विचारला होता असे राणाने सांगितले. राणाने सांगितले की, सैफ चालू शकत होता. तो स्वतः चालत येऊन रिक्षात बसला. मी त्याच्याकडून भाडेही घेतले नाही. त्यावेळी मी त्याला मदत करू शकलो, हे महत्वाचे आहे, असे राणाने सांगितले.
आणखी दोन मिलिमीटर चाकू आत घुसला असता तर सैफ अधू झाला असता!
सैफ अली खान प्राणघातक हल्ल्यातून थोडक्यासाठी बचावले आहेत. हल्लेखोराने त्यांच्या पाठीत भोसकलेला चाकू आणखी दोन मिलिमीटर आत घुसला असता तर स्पायनल कॉर्डला इजा होऊन त्यांना कायमचे अपंगत्व आले असते. परंतु देवाच्या कृपेने त्या संकटातून ते बचावले. आज त्यांना आयसीयूमधून विशेष खोलीत हलवण्यात आले, अशी माहिती वांद्रे येथील लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. त्यांच्या पाठीतून काढण्यात आलेला चाकूचा दोन इंचाचा तुकडा पुढील चौकशीसाठी पाठवण्यात आला असल्याचे सैफवर शस्त्रक्रिया करणारे न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे आणि त्यांच्या टीममधील डॉक्टरांनी सांगितले. बरगडीतून चाकू भोसकून पाठीच्या कण्यापर्यंत जाऊन तुटला होता. चाकूचा तुकडा जिथे अडकला होता तिथून अवघ्या दोन मिलिमीटरवर सैफ यांची स्पायनल कॉर्ड होती. तिला धक्का लागला असता तर लकवा होण्याची शक्यता होती, असे डॉक्टरांनी सांगितले.
‘शाहिद’सह तिघांची चौकशी
आज पोलिसांनी तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यापैकी एक असलेल्या शाहिदचा चेहरा हा हल्लेखोराशी मिळताजुळता होता. चार तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्याला सोडून दिले. त्याचा या हल्ल्याशी संबंध नव्हता.
पाच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर चाकूचा तुकडा काढला
पाठीमध्ये रुतून बसलेली वस्तू स्पायनल कॉर्डच्या अगदी जवळ होती. त्यामुळे स्पायनल कॉर्डला तिचा धक्का लागणार नाही अशा बेताने ती शस्त्रक्रियेने बाहेर काढावी लागणार होती. न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे आणि टीमने साडेपाच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर ती वस्तू बाहेर काढली.
डॉक्टर म्हणतात, जखमी सिंहासारखा ‘तो’ आला
रक्तबंबाळ अवस्थेत सैफ अली खान स्ट्रेचरशिवाय रुग्णालयात आले होते. गंभीर जखमा असूनही उपचारांना सिंहासारखे सामोरे गेले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. जखमेच्या जागी झालेले पाणी आजही काढावे लागले. त्यानंतर त्यांना काही पावले चालवण्यातही आले, असे लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले.
शाहरूखच्या ‘मन्नत’बाहेर संशयास्पद तरुण
सैफ अली खानवर घरात घुसून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली असतानाच बॉलिवूड स्टार शाहरूख खान याच्या वांद्रे बॅन्ड स्टॅण्ड येथील मन्नत बंगल्याच्या बाहेर एक तरुण संशयास्पद हालचाल करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. पोलीस त्या फुटेजची शाहनिशा करीत आहेत. चार दिवसांपूर्वीचा हा प्रकार असल्याचेही सांगितले जाते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List