वितरकांनो, दुचाकी खरेदीदारांना दोन हेल्मेट द्या
दुचाकी वाहनाची खरेदी केल्यानंतर वाहन वितरकाने खरेदीदाराला दोन हेल्मेट देणे बंधनकारक आहे. या निर्णयाची वितरकाने काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे असून, हेल्मेट न दिल्यास संबंधित वाहन वितरकावर कारवाई केली जाणार आहे. तसेच, यासाठी जास्तीचे पैसे आकारता येणार नाहीत. दुचाकी वाहन खरेदी केल्यानंतर संबंधित खरेदीदाराला दोन हेल्मेट देण्याबाबत मोटर वाहन कायद्यामध्ये सांगण्यात आले आहे. वाहनचालकाला हेल्मेट न दिल्यास कारवाई करण्याची तरतूद आहे. तसेच राज्यातील न्यायालयानेदेखील याबाबत आदेश दिलेले आहेत. मात्र, नागरिकांमध्ये याबाबत आवश्यक ती जनजागृती नसल्याचे दिसून येते.
दुचाकीस्वाराला झालेल्या अपघातांत बहुतांशवेळा डोक्यात हेल्मेट नसल्याने जीव गमवावा लागतो. अशाप्रकारच्या अपघाती घटनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे न्यायालयानेदेखील यावर चिंता व्यक्त केली असून, अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सूचित केलेले आहे. या पाश्र्वभूमीवर राज्य परिवहन विभागाने खबरदारी घेत यापूर्वीच दुचाकी उत्पादक आणि विक्रेत्यांना सूचना दिल्या आहेत. तसेच, याबाबत राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांना पत्राद्वारे कळविण्यात आले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नव्हती. आता पुणे आरटीओ कार्यालयानेदेखील याबाबत पत्र काढले असून, सर्व वाहन वितरकांना आदेश दिले आहेत. त्यानुसार दुचाकी वाहन खरेदीदाराला दोन हेल्मेट द्यावीत, असे यामध्ये म्हटले आहे. विक्रेत्यांनी हेल्मेट न दिल्यास संबंधित विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल.
तर ट्रेड सर्टिफिकेट होणार रद्द
वाहनविक्रेत्याने दुचाकी खरेदीदाराला दोन हेल्मेट देणे बंधनकारक आहे. त्यासाठी त्याला जास्तीची रक्कम देखील आकारता येणार नाही. अशा पद्धतीने हेल्मेट न दिल्यास संबंधित विक्रेत्याचे ट्रेड सर्टिफिकेट रद्द केले जाईल, असे आरटीओकडून सांगण्यात आले.
वाहन वितरकांनी दुचाकी खरेदीदाराला दोन हेल्मेट देणे गरजेचे आहे. हेल्मेट न दिल्यास संबंधित वाहनविक्रेत्यावर कारवाई केली जाईल.
स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List