सामना अग्रलेख – सीमा सुरक्षेचा ‘मुखवटा’
चीन तिकडे सीमांवर हजारो कृत्रिम गावे वसवीत आहे आणि आमचे राज्यकर्ते देशातील सर्व सीमांत गावांसाठी ‘व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम’चे फुगे हवेत सोडत आहेत. सीमा सुरक्षेसाठी एक व्यापक ‘अॅण्टी ड्रोन युनिट’ तयार करण्याच्या बाता करीत आहेत. गेली दहा वर्षे मोदी राजवट म्हणजे भारतीय सीमा सुरक्षेची ‘भाग्यरेषा’च असा एक ‘मुखवटा’ तयार करण्यात आला. मग तरीही ‘भारत सुरक्षेच्या बाबतीत भाग्यवान नाही,’ अशी खंत देशाच्या संरक्षणमंत्र्यांनाच का व्यक्त करावी लागली? आपले पंतप्रधान रशिया-युक्रेन युद्ध थांबवू शकतात, पण सीमा सुरक्षेबाबत भारताला ‘भाग्यवान’ का बनवू शकत नाहीत? देशातील सामान्य जनतेला पडलेले हे प्रश्न आहेत. त्याचे उत्तर सीमा सुरक्षेचा ‘मुखवटा’ लावलेल्यांनीच द्यायचे आहे!
सीमा सुरक्षेबाबत भारत भाग्यवान नाही. सीमांवर आपल्याला सातत्याने आव्हानांना तोंड द्यावे लागते, असे मत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले आहे. मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी जवानांना संबोधताना राजनाथ सिंह यांनी सीमा सुरक्षेसंदर्भात हे महत्त्वाचे वक्तव्य केले. संरक्षणमंत्री बोलले ते खरेच आहे. इतिहास काळापासूनच भारतीय सीमांवर परकीय आक्रमकांनी धडका दिल्या. घुसखोरी केली. स्वातंत्र्यानंतरदेखील भारतीय सीमा ‘शांत, परंतु तणावपूर्ण’ अशाच राहिल्या. चीनसारखे राष्ट्र तर लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या सीमेवर सतत उचापती करीत असते. तीच गोष्ट पाकिस्तानची. आता तर बांगलादेशात झालेल्या सत्तांतरानंतर ना तेथील हिंदू सुरक्षित राहिले आहेत ना तेथील सीमा. तेव्हा भारताच्या उत्तर आणि पश्चिम सीमांना सातत्याने परकीय आव्हाने आणि संकटांना तोंड द्यावे लागते, या संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या म्हणण्यात चुकीचे काहीच नाही. प्रश्न इतकाच की, मग मोदी राजवटीच्या यशस्वी वगैरे परराष्ट्र आणि संरक्षण धोरणाच्या ज्या पिपाण्या गेली दहा-अकरा वर्षे वाजविल्या जात आहेत, त्याचे काय? या सर्व पुंग्या गाजराच्याच निघाल्या आणि शेजारी राष्ट्रांनी त्या
मोडून खाल्ल्या
असे आता समजायचे काय? काँगेस राजवटींच्या परराष्ट्र धोरणावर तोंडसुख घेणारेच मागील दहा वर्षे सत्तेत आहेत. मग या दहा वर्षांत भारतीय सीमा सुरक्षित आणि संरक्षित का होऊ शकल्या नाहीत? शेजारी राष्ट्रांशी मोदी सरकारचे परस्परसंबंध खूप मैत्रीचे आहेत, असे भाजपवाले नेहमीच सांगत असतात, मग हे मैत्रीपूर्ण संबंध सीमांवरील तणाव का कमी करू शकलेले नाहीत? साबरमती नदीच्या किनाऱ्यावर झोपाळ्यावर बसून चिनी राष्ट्राध्यक्षांनी ढोकला-जिलेबी खाल्ली म्हणून चीनचे भारताविषयीचे धोरण ‘केम छो’ का झाले नाही? मोदी ‘विश्वगुरू’ बनल्याने चिनी ड्रगनसुद्धा भारतासमोर आता ‘म्यांव’ झाला आहे, असे ढोल मोदीभक्तांनी पिटले. मात्र हे ढोल चिन्यांनी लडाखचा भूभाग ताब्यात घेऊन, पाकड्यांनी जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी हल्ले कमी न करून तर बांगलादेशने हिंदूंवरील अत्याचार न थांबवून फोडले. नेपाळसारखे राष्ट्रदेखील आज भारताकडे डोळे वटारून पाहू लागले आहे. तेव्हा भारत हा सुरक्षेच्या दृष्टीने भाग्यवान नाही, हे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे म्हणणे खरेच आहे आणि गेली दहा वर्षे सत्तेत असणारेही हे
‘दुर्भाग्य’
बदलू शकलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. फक्त त्याचे उत्तरदायित्व सध्याचा सत्तापक्ष स्वीकारणार का? हा खरा प्रश्न आहे. देशाच्या सीमाभागांत मोदी राजवटीत पायाभूत सुविधांचा जेवढा विकास झाला तेवढा आधी कधीच झाला नाही, असे दावे सत्तापक्ष करीत असतो. मग तरीही आपल्या सीमा असुरक्षितच का आहेत? चीन तिकडे सीमांवर हजारो कृत्रिम गावे वसवीत आहे आणि आमचे राज्यकर्ते देशातील सर्व सीमांत गावांसाठी ‘व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम’चे फुगे हवेत सोडत आहेत. सीमा सुरक्षेसाठी एक व्यापक ‘अॅण्टी ड्रोन युनिट’ तयार करण्याच्या बाता करीत आहेत. दोन महिन्यांपूर्वी भारत आणि चीनमध्ये झालेल्या सैन्य माघारीच्या कराराच्या गुंगीतून बाहेर यायला तयार नाहीत. गेली दहा वर्षे मोदी राजवट म्हणजे भारतीय सीमा सुरक्षेची ‘भाग्यरेषा’च असा एक ‘मुखवटा’ तयार करण्यात आला. मग तरीही ‘भारत सुरक्षेच्या बाबतीत भाग्यवान नाही,’ अशी खंत देशाच्या संरक्षणमंत्र्यांनाच का व्यक्त करावी लागली? आपले पंतप्रधान रशिया-युक्रेन युद्ध थांबवू शकतात, पण सीमा सुरक्षेबाबत भारताला ‘भाग्यवान’ का बनवू शकत नाहीत? देशातील सामान्य जनतेला पडलेले हे प्रश्न आहेत. त्याचे उत्तर सीमा सुरक्षेचा ‘मुखवटा’ लावलेल्यांनीच द्यायचे आहे!
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List