परळीत कशाला, अंबाजोगाईत राहू! ‘आका’च्या दहशतीने स्थलांतर वाढले
परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे पवित्र ठिकाण. साधारण लोकवस्तीचे असलेले हे गाव. थर्मलमुळे परळी विस्तारली. थर्मलच्या माध्यमातून आलेल्या सुबत्तेने परळीत गुन्हेगारीचे विश्व फोफावले. राख माफिया, कंत्राट माफिया, लेबर माफिया, जागा माफिया तयार झाले. एवढेच कमी होते म्हणून की काय अवैध गर्भपात करण्यासाठी देशभरातील लोक परळी गाठू लागले! रिव्हॉल्व्हर, गावठी कट्टे लहान थोरांच्या कमरेला लटकू लागले. हवेत गोळीबार करण्याच्या फॅशनचा जन्म परळीतलाच! शाळा, कॉलेजात निघालेल्या तरुणींची छेडछाड हा प्रकार नित्याचाच. तक्रार कुणाकडे करायची? कारण सगळे गुंडपुंड ‘आका’चे दरबारी! लेकबाळ वाचवायची तर परळीत राहणेच नको, म्हणून शेकडो कुटुंबांनी अंबाजोगाई जवळ केली!
परळीच्या राजकारणात गोपीनाथ मुंडेंचा उदय झाला. तो काळ परळीकरांनी चांगला अनुभवला. साहेबांची करडी नजर सगळीकडे फिरायची. कुणी व्यथा घेऊन आले तर साहेब आस्थेने विचारपूस करायचे. ही वैद्यनाथाची परळी आहे. त्याला बट्टा लागायला नको असे ते नेहमी म्हणत. गोपीनाथ मुंडे युती सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री झाले. गृहमंत्रीही होते. याच काळात धनंजय मुंडे अभाविपमध्ये सक्रिय झाले. उडाणटप्पूंची टोळी दिवसभर परळीत गाड्यांवर हुंदडत असे. परळीतील छेडछाडीच्या घटनांची तेव्हा दबक्या आवाजात राज्यभर चर्चा होत होती, पण राजकीय वरदहस्तामुळे कुणीही बोलण्यास धजावत नव्हते. याच काळात सुजान नागरिक, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, मोठ्या अधिकाऱ्यांनी परळीत राहणेच नको म्हणून अंबाजोगाई जवळ केले.
वाल्मीक कराडची काम करण्याची पद्धत भल्याभल्यांना अचंबित करणारी. थंड डोक्याने काम करणारा अशी त्याची ख्याती. आपल्या कामाची त्याने वाटणी केली होती. राख उचलण्याचे काम करणारी टोळी वेगळी, जागांच्या संदर्भातील काम करणारे वेगळे, पोलीस प्रकरणे हाताळणारे वेगळे, अधिकारी स्तरावर बोलणी करणारे वेगळे… एवढ्यावर निस्तरले नाहीतर कानशिलावर बंदूक ठेवणारेही त्याने तयार केले होते. याच टोळीने मस्साजोगचे संतोष देशमुख यांना हाल हाल करून ठार मारले. ही क्रूरता, हा अमानुषपणा विशीतल्या तरुणांमध्ये भिनवणारा वाल्मीक हा स्वतः किती थंड रक्ताचा असेल याची कल्पनाच केलेली बरी!
वाल्मीक कराडचा दरबार…
आजही परळीत अधिकारी, कर्मचारी येण्यास नाखूश असतात, किंबहुना धजावतच नाहीत. त्याचे कारण ‘आका’चा दरबार! गोपीनाथ मुंडे यांची राजकीय कारकीर्द ऐन भरात असताना पंडित अण्णा दरबार भरवत असत. या दरबारात मोठमोठे अधिकारी, कंत्राटदार आपल्या व्यथा घेऊन येत असत. मनाजोगी बदली घेणे, भ्रष्टाचाराच्या चौकश्या थांबवणे, कंत्राटांचे हेरफेर या दरबारात होत असत. धनंजय मुंडेंच्या काळात हा दरबार वाल्मीक कराड भरवू लागला. न्यायनिवाडे करण्याचे कामही वाल्मीक कराड करू लागला. परळीच्या न्यायालयातील खटले कमी करण्याचे काम वाल्मीकने केले असे तेथील वकील खासगीत गंमतीने म्हणतात. गुन्हेगारी प्रकरणे पोलीस ठाण्यात पोहोचण्याआधी वाल्मीकच्या दरबारी निवाड्यासाठी येत. एखादे प्रकरण चुकून पोलिसांकडे गेलेच तर पोलिसांसह तक्रारदारालाही दरबारी हजर राहण्याचे फर्मान सुटत असे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List