संकटांवर मात करीत कणदूरला गुऱ्हाळ उद्योग सुरु
गूळदरात होत असलेली परवड, कामगारांचा तुटवडा आणि वाढता उत्पादन खर्च अशा अनेक संकटांवर मात करीत आणि तालुक्यातील इतर गावांतील गुऱ्हाळ उद्योग संपुष्टात आला असतानाही कणदूर येथील गुऱ्हाळ मालक सुभाष पाटील यांनी घरच्या लोकांच्या मदतीने तालुक्यातील एकमेव गुऱ्हाळघर टिकवून ठेवले आहे. त्यामुळे चालू हंगामात तालुक्यात फक्त कणदूर येथेच नव्या गुळाची निर्मिती होताना दिसत आहे.
शिराळा तालुका हा पूर्वीपासून गुऱ्हाळ उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. तालुक्यात आरळ्यापासून ते देववाडीपर्यंतच्या बहुतांश गावांमध्ये शेकडो गुऱ्हाळघरे होती. साधारणतः दिवाळी ते गुढीपाडवा यादरम्यान ही गुऱ्हाळघरे सुरू असायची. प्रत्येक गावागावांत शेकडो लोकांना या गुऱ्हाळ घरात रोजगार मिळायचा. असंख्य शेतकरी गुन्हाळ घरात नेऊन आपला ऊस गाळून गूळ बनवायचे आणि तो गूळ कराड आणि कोल्हापूरच्या बाजारपेठेत पाठवायचे; परंतु काळाच्या ओघात या गुऱ्हाळघरांना घरघर लागून असंख्य गावांतील गुऱ्हाळघरे कायमस्वरूपी बंद झाली.
कणदूर गावात या अगोदर ११ गुऱ्हाळघरे होती; परंतु विविध समस्यांमुळे एकेक करून ती बंद झाली. मात्र, सुभाष पाटील या शेतकऱ्याने आपले गुऱ्हाळघर विविध अडचणी असतानाही सुरू ठेवले आहे. या गुन्हाळ घरासाठी त्यांच्या घरातील सर्व लोक राबत आहेत. अपुरे कामगार असतानाही त्यांनी हा व्यवसाय बंद न करता पुढे चालू ठेवला. सुभाष पाटील यांच्यासह त्यांचे दोन भाऊ व घरातील इतर व्यक्तीही दररोज या कामांमध्ये व्यस्त असतात. बाहेरील काही मोजकेच लोक या गुऱ्हाळघरात काम करतात.
सध्या पाटील यांनी स्वतःच्या शेतातील सर्व उसाचे गुऱ्हाळघरात गळीत करण्याचे काम सुरू ठेवले आहे. या कामासाठी पुरेसे कामगार नसतानाही त्यांनी चिकाटीने हा उद्योग चालवला आहे. वारणाकाठच्या बाकी सर्व गावांत गुऱ्हाळघरांचे नामोनिशाण कायमस्वरूपी मिटले आहे. विविध समस्या असतानाही हा उद्योग टिकवण्यासाठी चिकाटीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
गुऱ्हाळघरांसमोरील समस्या
बाजारपेठेत अपेक्षित दराचा अभाव, कामगारांचा तुटवडा, गुऱ्हाळघरांकडे शेतकऱ्यांनी फिरवलेली पाठ, उत्पादन खर्चात झालेली वाढ, गळीतासाठी लागणारे प्रचंड कष्ट आणि खर्च
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List