सायबर भामट्यांकडून फसवणूक होण्याची भीती, सरकारकडून पॅन कार्डच्या नव्या आवृत्तीची घोषणा
केंद्र सरकारने पॅन कार्डच्या नव्या आवृत्तीची घोषणा केली असून, त्या अनुषंगाने सर्वसामान्य जनतेची सायबर भामट्यांकडून फसवणूक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासाठी कोणत्याही फोन, ई-मेलला प्रतिसाद देऊ नका, कोणालाही ओटीपी शेअर करू नका, असा सावधानतेचा इशारा पोलीस यंत्रणेकडून दिला जात आहे. नागरिकांनीही अशा कॉलपासून, तसेच सोशल मीडियावरील फेक साईटपासून सावध राहणे गरजेचे आहे.
गेल्या काही वर्षांत सायबर गुन्ह्यांची संख्या झपाट्याने वाढत असून, यातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक होत असल्याचे गुन्हे घडत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने पॅन कार्डच्या नव्या आवृत्तीची घोषणा केल्यानंतर सायबर क्राईमचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दृष्टीने पोलीस यंत्रणेने सर्वसामान्य जनतेला अलर्ट केले आहे.
पॅन कार्डच्या नव्या आवृत्तीची घोषणा करण्यात आली असली, तरी यासाठी तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही. सरकार नवीन अपडेटेड पॅन कार्ड थेट तुमच्या पत्त्यावर पाठवेल, असे शासन यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे. मात्र, तरीही सायबर गुन्हेगार फोन, मेसेज किंवा ई-मेलच्या माध्यमातून जनतेला सापळ्यात ओढण्याचा प्रयत्न करण्याचा धोका पोलीस यंत्रणेलाही वाटत आहे. या पार्श्वभूमीवरच पोलीस यंत्रणेने जनतेला सावधानतेचा इशारा दिला आहे.
पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी जर कोणी फोन, मेसेज किंवा ई-मेल पाठवले, तर त्याला उत्तर देऊ नका. कोणतीही माहिती किंवा ओटीपी शेअर करू नका, असे आवाहन पोलीस यंत्रणेतर्फे करण्यात आले आहे. जागरूक राहा, सायबर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करा, असे आवाहन सातारचे जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांनी केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List