राजकीय बॅनर, पोस्टर, होर्डिंगवर बंदी घाला, आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन
गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गोंधळात प्रत्येक शहराच्या कानाकोपऱ्यात लावण्यात येणाऱ्या हजारो पोस्टर्स, बॅनर आणि होर्डिंगमुळे शहरांमध्ये बकालपणा येत आहे. त्यामुळे 2025 या नव्या वर्षात लोकसेवेचा संकल्प करताना राजकीय पोस्टर, बॅनर आणि होर्डिंगवर प्रतिबंध घालण्याचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घ्या, असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.
गेल्या दोन वर्षांत राजकीय गोंधळ सुरू असताना राजकीय होर्डिंगचेही पेव फुटले आहे. जगात कुठेही असे राजकीय पोस्टर लावले जात नाहीत, मात्र आपल्याकडे अनेक ठिकाणी बेकायदेशीररीत्या होर्डिंग लावण्यात येत आहेत. यामुळे शहरे विद्रूप होत आहेत. याचा एक नागरिक म्हणून खेद वाटतो, असे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
होर्डिंगवर प्रतिबंध घातल्यास आपली शहरे स्वच्छ दिसतीलच, शिवाय आपल्या कार्यकर्त्यांनाही अशा खर्चातून दिलासा मिळेल. याबाबत ठोस निर्णय घेतल्यास आपण आपल्या पाठीशी राहू, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. आपण सत्तेत मुख्यमंत्री आणि आम्ही विरोधी पक्ष म्हणून असलो तरी या गोष्टींवर आपण एकत्र काम केलेच पाहिजे, असे आवाहनही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले. आपण याविषयी बैठक बोलावली किंवा सर्व पक्षांना पत्र लिहिले तर मी, माझा पक्ष आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहील, असेही त्यांनी म्हटले आहे.
दोन वर्षांत फक्त निवडक पोस्टर्स हटवली
गेल्या दोन वर्षांत मुंबई महानगरपालिकेकडून फक्त निवडक पोस्टर्स हटवण्यात आली, मात्र सत्ताधारी पक्षाची पोस्टर्स मात्र तशीच दिसत आहेत. आपण या बालीश राजकीय स्पर्धेला बाजूला ठेवून सर्व राजकीय पक्षांनी बेकायदेशीर पोस्टर, बॅनर आणि होर्डिंग्ज न लावण्याचा निर्णय घेतला तर नागरिकांना आपण मोठा दिलासा देऊ शकतो, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List