मानवाधिकार आयोगातील नियुक्त्या आधीपासूनच निश्चित, निवड समितीतील सहकाऱ्यांच्या मताकडे दुर्लक्ष केल्याचा काँग्रेसचा आरोप
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही. रामासुब्रमण्यन यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यांच्या नियुक्तीवरून आता काँग्रेसने जोरदार टीकास्त्र सोडले आहे. या नियुक्त्या आधीपासूनच निश्चित होत्या, असा सणसणीत आरोप काँग्रेसने केला आहे. याबाबत काँग्रेसने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या निवड समितीत लोकसभेचे विरोधी पक्षनते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हेदेखील होते. परंतु, त्यांचे मत गांभीर्याने घेतले नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
निवड समितीची गेल्या आठवड्यात बुधवारी बैठक झाली होती; परंतु नियुक्त्या आधीपासूनच निश्चित होत्या. त्यामुळे ती बैठक केवळ औपचारिक होती. याप्रकरणी सहकाऱ्यांचा सल्ला घेण्याच्या परंपरेकडे दुर्लक्ष करण्यात आले. निष्पक्षता निवड समितीच्या विश्वसनियतेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे; परंतु अशाप्रकारे नियुक्त्या करण्याने निष्पक्षतेच्या सिद्धांतांना तिलांजली दिली गेली, असा आरोप करण्यात आला आहे. सर्वांचे मत घेण्याऐवजी निवड समितीने बहुमतावर विश्वास ठेवला. या बैठकीत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. परंतु, या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आले असा आरोपही काँग्रेसने केला आहे.
काय म्हटले आहे काँग्रेसच्या प्रसिद्धीपत्रकात
राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रोहिंटन फली नरीमन आणि न्यायमूर्ती केएम जोसेफ यांच्या नावावर मेरीटच्या आधारावर सहमती दर्शवली होती. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग एक अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेचे काम समाजातील उपेक्षित घटकांतील लोकांच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करणे आहे. त्यामुळे या संस्थेने समाजातील विविध समुदायांच्या समस्यांचे निदान करण्याच्या दृष्टीने काम करण्याची गरज आहे.
न्यायमूर्ती रोहिंटन फली नरीमन पारसी या अल्पसंख्याक समुदायातील आहेत. ते संविधानाप्रति कटिबद्ध आहेत. त्यामुळे त्यांना जर अध्यक्ष बनवले गेले असते तर देशाप्रति त्यांच्या समर्पणाचा मजबूत संदेश समाजात गेला असता, असे काँग्रेसने म्हटले आहे. अशाचप्रकारे न्यायमूर्ती कुट्टियिल मॅथ्यु जोसेफ हेदेखील ईसाई समुदायातील आहेत. त्यांनी वैयक्तिक स्वातंत्र्य आणि उपेक्षित वर्गाच्या संरक्षणावर जोर देणारे अनेक निकाल दिले याकडेही प्रसिद्धीपत्रकात लक्ष वेधण्यात आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List