प्रीपेड मीटरला गडहिंग्लजमध्ये नागरिकांचा विरोध, 6 जानेवारीला महावितरण कार्यालयावर काढणार मोर्चा
महावितरणच्या जुन्या मीटरएवजी स्मार्ट आणि प्रीपेड मीटरचा ठेका अदानी उद्योग समूहाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला जनतेचा तीव्र विरोध असून, गडहिंग्लज उपविभागात हे मीटर बसविण्यात येऊ नयेत, अशी मागणी आजरा, भुदरगड, गडहिंग्लज, चंदगड वीजग्राहक संघर्ष समितीच्या वतीने महावितरणच्या गडहिंग्लज विभागीय कार्यकारी अभियंता तसेच प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान, या विरोधात 6 जानेवारी 2025 रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने अदानी उद्योग समूहासोबत करार करून महावितरणच्या जुन्या मीटरऐवजी नवीन मीटर बसविण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी अदानी उद्योग समूहाने नोकरभरती केली असून, प्रायोगिक तत्त्वावर शासकीय कार्यालयात मीटर बसवले जात आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ आणि महावितरण ही शासनाची अधिकृत कंपनी असताना, अदानी उद्योग समूहासोबत असा करार करून स्मार्ट व प्रीपेड मीटरची सक्ती का? राज्य विद्युत मंडळ आणि महावितरण कंपनीने प्रस्थापित केलेली सर्व यंत्रणा, पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर अदानी कंपनीला आंदण देण्याचाच हा प्रकार आहे. त्यामुळे महावितरण आणि राज्य विद्युत मंडळ अदानीच्या घशात घातले जाणार आहे. यात नेमके कोणाचे हित साधले जाणार आहे, असा सवाल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रक्रियेलाच विरोध असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
गडहिंग्लज विभागातील डोंगराळ आणि अतिपावसाच्या भागात सोलरसक्ती ही शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे. ही सक्ती मागे घेऊन मागेल त्या शेतकऱ्याला वीज कनेक्शन मिळाले पाहिजे. अदानी उद्योग समूहासोबत स्मार्ट आणि प्रीपेड मीटरबाबत जो करार झाला आहे, त्याची प्रत मराठी भाषेत जनतेसाठी प्रत्येक गावचावडीवर लावावी व तालुकास्तरावर शेतकऱ्यांचे मत जाणून घेण्यासाठी जनसुनावणी घ्यावी, अशी मागणी या निवेदनातून केली आहे.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, श्रमिक मुक्ती दलाचे कॉ. संपत देसाई, ‘गोकुळ’च्या संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, काँग्रेसचे विद्याधर गुरबे, अजित बंदी, जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, नागेश चौगुले, अमर चव्हाण, युवराज बरगे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिलीप माने, अजित खोत यांच्यासह शिवाजी राऊत, रोहन जाधव, मनीष हावळ, श्रीशैलाप्पा साखरे, बाळासाहेब महाडिक, विनय पाटील, सुरेश चव्हाण, युवराज राऊत, विलास यमाटे, उत्तम देसाई, वीरसिंग बिलावर, किरण पाटील, विनायक पाटील, अनिल खाणाई, कृष्णात कांबळे उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List