हिमाचलमध्ये तुफान हिमवृष्टी, ट्रॅफीकमध्ये अडकलेल्या 8000 पर्यटकांची सुटका; 223 रस्ते बंद
सध्या नाताळचा उत्साह देशभरात असून पर्यटक मोठ्या संख्येने सुट्टीचा आनंद घेण्यासाठी देशभरातील विविध पर्यटन स्थळांना भेट देत आहेत. हिमाचल प्रदेशमध्येही पर्यटकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. परंतु सध्या हिमाचल प्रदेशमध्ये तुफान हिमवृष्टी होत आहे, त्यातच पर्यटकांची झुंबड उडाली आहे. त्यामुळे हिमालचमधील शिमला, कुल्लू आणि मनाली या शहरांमध्ये भयंकर ट्रॅफीक जाम झाले होते. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जवळपास 1500 गाड्यांमध्ये 8000 पर्यटक ट्रॅफीकमध्ये अडकले होते.
शिमला, मनाली आणि कुल्लू ही हिमाचल प्रदेशमधील शहरे पर्यटकांनी फुलून गेली आहेत. परंतु सतत सुरू असणाऱ्या हिमवृष्टीमुळे पर्यटकांसह स्थानिकांनाही विविध अडचणींचा सामना करावा लागत आहेत. विशेष करून बर्फाच्छादित रस्त्यांवर गाडी चालवण्याचा अनुभव नसल्यामुळे बऱ्याच जणांना गाडी चालवताना अडचण निर्माण झाली. त्यामुळे ट्रॅफीकमध्ये वाढ झाली. त्यातच भयंकर थंडी अन् आणि रात्रभर गाडीमध्ये फसल्यामुळे पर्यटकांचे अक्षरश: गंभीर हाल झाले. धक्कादायक बाब म्हणजे विविध दुर्घटनांमध्ये चार जणांचा मृत्यूही झाला आहे.
सोमवारी (23 डिसेंबर) दुपारी 2 वाजता सुरू करण्यात आलेले बचावकार्य रात्रभर सुरू होते. शुन्य डिग्री सेल्सियसपेक्षा कमी तापमान असताना पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्परता दाखवत प्रचंड मेहनत घेतली. मंगळवारी (24 डिसेंबर) सकाळी 10 वाजेपर्यंत बचावकर्य सुरू होते. ट्रॅफीकमध्ये अडकलेल्या सर्व 8000 पर्यटकांना सुरक्षितरित्या वाचवण्यात आले आहे, अशी माहिती मनालीचे डीएसपी केडी शर्मा यांनी दिली.
हिमाचल प्रदेशमध्ये सुरू असलेल्या हिमवृष्टीमुळे तीन राष्ट्रीय महामार्गांसह जवळपास 223 रस्ते बंद करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग अटारी ते लेह, कुल्लू जिल्ह्यातील सेंज ते औट, किन्नौर जिल्ह्यातील खाब संगम आणि लाहौल-स्पीती जिल्ह्यातील ग्रम्फू यासह 223 रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List