मुंबई ते उरण चला सुसाट, फक्त 35 मिनिटांत; जेएनपीए समुद्रात उतरवणार स्पीड बोटी
जेएनपीएने लाकडी प्रवासी बोटींना सरत्या वर्षात अलविदा करून प्रवासी सेवेसाठी अद्यावत स्पीड बोटी समुद्रात उतरवणार आहे. त्यामुळे सागरी मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मुंबईतून उरण फक्त 35 मिनिटांत गाठता येणार आहे. हा सुसाट प्रवास येत्या फेब्रवारी महिन्यापासून सुरू होणार आहे.
जेएनपीए बंदरातून मुंबईत येण्याजाण्यासाठी लाकडी बोटींची व्यवस्था आहे. सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत या सागरी मार्गावरून लाकडी बोटी सोळा राऊंड ट्रीप प्रवासी वाहतूक करीत होत्या. दरम्यानच्या काळात उरणपर्यंत रेल्वे सुरू झाली आहे. त्याशिवाय वाहतुकीसाठी अटल सेतूही खुला झाला आहे. यामुळे या जेएनपीए-गेटवे (मुंबई) या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक रोडावली आहे. त्यानंतर जेएनपीएनेही बोटींची संख्या कमी करून आता मागील काही महिन्यांपासून आठपर्यंत आणून सोडली आहे. मात्र त्यानंतरही प्रवासी संख्या घसरणीलाच लागली आहे. त्यामुळे जेएनपीए प्रशासनाने लाकडी प्रवासी बोटी बंद करून प्रदूषणविरहित इलेक्ट्रिक बोटी चालवण्याचा निर्णय घेतला. स्पीड बोटींचा पर्याय स्वीकारण्याची संकल्पना वर्षभरापूर्वीच जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी अमलात आणण्यासाठी सूचना केली होती.
38 कोटींच्या खर्चाला मंजुरी
उन्हाळी हंगामात 20-25 प्रवासी व पावसाळी हंगामात 10-12 क्षमतेच्या हरित सागर आणि हरित नौका या दोन वेगवान बोटी फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच प्रवासी वाहतुकीसाठी दाखल होणार आहेत. जेएनपीएने 10 वर्षांच्या या दोन स्पीड बोटींच्या 37 कोटी 89 लाख 94 हजार 190 खर्चाच्या निधीलाही 20 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या बोर्ड ऑफ ट्रस्टींच्या बैठकीत मंजुरी दिली आहे, असेही जेएनपीएचे उपसंरक्षक कॅप्टन बाळासाहेब पवार यांनी स्पष्ट केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List