लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्यासाठी सरकार भावाला, नवऱ्याला बेवडे करणार; संजय राऊत यांचा हल्लाबोल
लाडकी बहीण सारख्या योजनामुळे सरकारी तिजोरी मोकळी झाली असून महसुली तूट वाढली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांच्या बैठकीमध्ये दारुच्या दुकानांचे परवाने वाढवण्यावर चर्चा झाली. याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्यासाठी लाडक्या बहिणींच्या भावाला, नवऱ्याला दारुडे करण्याची सरकारची योजना असल्याचा हल्लाबोल राऊत यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना केला.
लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये देण्यासाठी लाडक्या बहिणींचे भाऊ, नवऱ्याला दारुडे करणार आहेत. 1500 रुपयांसाठी संपूर्ण महाराष्ट्र दारुडा करण्याची योजना असेल तर हे अत्यंत गंभीर आहे. दारुची दुकाने वाढवणार, ड्राय डे कमी करणार, त्यानंतर शॉप आणि मॉलमधून दारु विक्री करण्याचेही प्रपोजल आलेले आहे. काही राज्यात घरपोच दारुही मिळते. काहीही करून लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्यासाठी घराघरात दारु पोहोचवा असे सरकारचे नवीन व्हिजन दिसत आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, लाडक्या बहिणींना 1500 रुपये द्यायचे आणि त्या बदल्यात बहिणींच्या घरात बेवडे, दारुडे निर्माण करायचे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावणारा हा प्रकार आहे. महसूल वाढवण्यासाठी अजित पवार यांच्यासारखा नेता हा विचार करत असेल तर हे राज्याचे दुर्दैवच म्हणायला हवे. हा त्यांचा विचार असेल तर त्यांनी त्यांच्या होर्डिंग्जवर किंवा कार्यक्रमात शाहू, फुले, आंबेडकर यांचे फोटो लावणे बंद केले पाहिजे.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेचे निकष आणखी कठोर करण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्या आहेत. भविष्यात सरकार अशी योजना बंदही करू शकते. लाखो, हजारो कोटींचे ओझे घेऊन आणि भ्रष्टाचाराची लुटमार सुरु ठेऊन हे राज्य चालवणे सोपे नाही. निवडणुकीच्या आधी मतांसाठी कोणतेही निकष न लावता पैसे वाटले आणि निवडणुका जिंकल्यावर निकष लावण्यात येत आहेत. त्यात दारु दुकानांचे परवाने वाढवणे हा गंभीर मुद्दा आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना 1500 रुपयात आपण घरामध्ये कोणते विष आणतोय याचे चिंतन केले पाहिजे, असेही राऊत म्हणाले.
महसूल वाढीसाठी उत्पादन शुल्क विभागाला 2,500 कोटींचे ‘टार्गेट’
महाराष्ट्रच नव्हे तर देशामध्ये महागाईने उच्चांक गाठलेला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी मंडईत गेले होते. जो लसून 40 रुपये किलो होता तो आता 400 रुपयांवर गेला आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देता, पण हीच बहीण थैली घेऊन मंडईत जाते तेव्हा तिची पिशवी रिकामी येते. या पैशात काहीही मिळत नाही, अशी टीका राऊत यांनी केली.
40 रुपयांचा लसूण तब्बल 400 रुपयांना, लाडक्या बहिणींना कमळाबाईचे न्यू ईयर गिफ्ट
वाचा सविस्तर – https://t.co/dOMyaUP0BP pic.twitter.com/2YikoPbnkT
— Saamana Online (@SaamanaOnline) December 25, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List