Santosh Deshmukh Murder Case – पोलिसांचे CDR काढा, सगळे गुन्हेगार सापडतील; खासदार बजरंग सोनवणे यांचे गंभीर आरोप
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी पोलिसांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला आहे. हत्येच्या घटनेला 16 दिवस उलटून गेले. तरीही या हत्याकांडाचा मास्टरमाईंड आणि तीन आरोपी फरार आहेत. त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, असे अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी बीडमधील पत्रकार परिषदेत केली.
संतोष देशमुख यांनी काय गंभीर गुन्हा केला होता? टॉर्चर करून त्यांची हत्या केली. 6 डिसेंबरला पोलिसांनी गंभीर गुन्हा दाखल करून का घेतला नाही? 6 आणि 9 डिसेंबरला पोलिसांना कुणे फोन केला? बनसोड नावाच्या पीआयला कोणाचा फोन आला? 10 डिसेंबरला संध्याकाळी गुन्हा दाखल होतो. तेही पोलीस अधीक्षक आल्यावर. पोलीस अधीक्षकही पोलीस ठाण्यात येत नाहीत. दुसरीकडे येऊन टाइप करून ते जातात. म्हणजे किती दहशत आहे. ही कुणाची दहशत होती? हे सुद्धा पीआय, पीएसआयने सांगितलं पाहिजे, अशी मागणी खासदार सोनवणे यांनी केली.
पोलीस अधीक्षकांनी स्वतः येऊन तो गुन्हा दाखल केला. 6 आणि 9 डिसेंबरच्या घटनेवरील पोलिसांच्या कारभारावर खासदार सोनवणे यांनी संशय व्यक्त केला आहे. पोलीस स्टेशनच्या पीआयचा सीडीआर काढा. ही घटना घडल्यानंर 9 डिसेंबरला सरपंचाच्या भावाशी कोण-कोण बोललं? आणि पोलीस स्टेशनला कोण बोललं? बनसोड नावाच्या पीआयला कोणाचा फोन आला? या पीआयचाही सीडीआर काढा. महाजन साहेबांना कोणाचा फोन आला? पाटील कोणाच्या संपर्कात होते? या तिघांचा सीडीआर काढा सर्व प्रकरण उघड होईल. या सर्वांचे सीडीआर काढल्यावर बऱ्यापैकी गुन्हेगार सापडतील, असा दावा खासदार बजरंग सोनवणे यांनी केला.
या प्रकरणात सर्व क्रम का चुकवले गेलेत? असा सवाल खासदार बजरंग सोनवणे यांनी केला. संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे. आणि त्यांच्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे. त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी त्यांच्या कुटुंबीयांची, आमची आणि संपूर्ण बीड जिल्ह्याची मागणी आहे. एक दोघांना शिक्षा काय? याचा खरा मास्टरमाईंड कोण आहे? हे कोणी घडवलं? त्याला शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली.
दरम्यान, मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये शनिवारी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड सहभागी होणार आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List