पोलीस डायरी – बीडमध्ये ‘बाहुबलीं’चे राज्य!
>> प्रभाकर पवार
2024 साल संपत आले, परंतु गेल्या 12 महिन्यांत आपल्या देशात बऱ्याच धक्कादायक घटना घडल्या. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकार पुन्हा केंद्रात सत्तेवर आले. भाजपचे नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. महाराष्ट्रातही महायुतीचे सरकार विराजमान झाले. त्यांना पाशवी बहुमत मिळाले. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, परंतु पायाभूत सुविधा वगळता आपल्या देशातील महागाई काही कमी झाली नाही. बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे आपल्या देशात झपाट्याने गुन्हेगारी वाढत आहे.
सायबर क्राईम वाढला स्ट्रीट क्राईम कमी झाला असे बोलले जाते, परंतु त्यात तथ्य नाही. सर्व प्रकारचे गुन्हे या देशात वेगाने वाढत आहेत. महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व त्याही सुरक्षित नाहीत. कोण कधी हल्ला करून आपल्या हातातील पैशाची बॅग, अंगावरील दागिने पळवून नेईल याची शाश्वतीच नाही. व्हाईट कॉलर गुन्हयांनी तर उच्चांक गाठला आहे. मुंबईत गैंगवॉर वाढले तेव्हा संघटित गुंड टोळ्यांविरुद्ध महाराष्ट्र शासनाने 1999 साली ‘मोक्का’ कायदा अमलात आणला. त्याचा परिणाम लगेच दिसून आला. मुंबईतील गैंगवॉर आटोक्यात आले, परंतु गेल्या दोन-अडीच वर्षांपासून संघटित गुंड टोळ्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. या वर्षीच्या 5 जानेवारी 2024 रोजी शरद मोहोळ या पहेलवान गुंडाची कोथरूड येथे त्याच्या घराजवळच प्रतिस्पर्धी टोळीकडून गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मुंबईतील बोरिवली (पश्चिम) आयसी कॉलनीमध्ये शिवसेनेचे (उद्भव बाळासाहेब ठाकरे) लोकप्रिय नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नोरोन्हा या माथेफिरूने 8 फेब्रुवारी 2024 ला गोळ्या घालून हत्या केली. ही हत्या राजकीय असल्याचा आरोप झाल्यावर न्यायालयाने अभिषेक घोसाळकर हत्येचा तपास सीबीआयकडे सोपविला आहे.
अभिषेक घोसाळकर यांना मारल्यानंतर लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून सुपरस्टार सलमान खान याला 14 एप्रिल 2024 रोजी गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न झाला, परंतु तो फसला. सलमानच्या घराबाहेर गोळीबार करून शूटर पळून गेले. सलमान खानचा कौटुंबिक मित्र तसेच माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांना वांद्रे येथे 12 ऑक्टोबर 2024 रोजी गोळ्या घालून ठार करण्यात बिष्णोई टोळीला मात्र यश आले. या हत्येप्रकरणी डझनभर आरोपींना मुंबई क्राईम ब्रँचने अटक केली, परंतु हत्येमागचा खरा हेतू काय, यावर प्रकाश टाकण्यात पोलिसांना यश आले नाही. ही हत्या राजकीय हेतूनेच घडवून आणण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
अभिषेक घोसाळकर व बाबा सिद्दिकी यांची पॉलिटिकल मर्डर असल्याचे बोलले जात असतानाच बीड जिल्हयातील मस्साजोग गावचे अत्यंत लोकप्रिय तरुण सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी दिवसाढवळ्या अपहरण करून ठेचून ठेचून क्रूरपणे हत्या करण्यात आली. ओळख पटू नये म्हणून आरोपींनी संतोष देशमुख यांच्या सर्व शरीराचा, अवयवांचा चेंदामेंदा केला. एवढं क्रौर्य कधी कुठल्या पोलिसाने, तपास अधिकाऱ्याने पाहिले नसावे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) बीड जिल्हयातील परळी मतदारसंघाचे आमदार व कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्ती वाल्मीक कराड यांच्या इशाऱ्यावरून संतोष देशमुख यांना ठार मारण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. कराड हेच मास्टरमाइंड आहेत. सारी पोलीस यंत्रणा त्यांच्या मुठीत असते. विरोध करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना ते गायब करतात. इतके ते बलशाली आहेत, असेही बोलले जाते. 1992 साली गायब झालेल्या रंजन मुखर्जी या बीडच्या पोलीस अधीक्षकाचा अद्यापि शोध लागलेला नाही. कराड यांना बीड जिल्हयात प्रति धनंजय मुंडे म्हणूनही ओळखले जाते. धनंजय मुंडे यांनीही आपल्या कराडसंबंधाची जाहीरपणे कबुली दिली आहे. तरीही धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाची शपथ दिली गेली. आरोप होऊनही खातेवाटप केले गेले. यावरून सत्ताधाऱ्यांनाच ‘बाहुबली’ हवे आहेत असे दिसते. बाहुबलींना सोबत घेऊनच राज्यकर्ते आपल्या मार्गातील काटे दूर करीत असतात. पोलीस यंत्रणा हाताशी असली की काहीही करता येते. कुणालाही गायब करता येते. कोकणातील गोवेकरचे काय झाले? त्याला कुणी गायब केले? सत्यविजय भिसे, अंकुश राणे यांना कुणी मारले? हे साऱ्या कोकणवासीयांना माहीत आहे. संतोष देशमुख हत्येप्रकरणी पकडण्यात आलेल्या चार आरोपीच्या ‘गॉड फादर’ पर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘एसआयटी’ कधीच पोहोचणार नाही. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे हत्येमागचा खरा हेतूही स्पष्ट होणार नाही. प्रत्येक पॉलिटिकल मर्डरमध्ये हेच पाहावयास मिळते. लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी एसआयटी’ स्थापन केल्या जातात, पीडितांना न्याय देण्यासाठी नाही. वाल्मीक कराड याच्या साथीदारांच्या क्रौर्यनि सारा बीड जिल्हा हादरला आहे. परंतु राज्यकर्त्यांना याचे काहीच सोयरसुतक नाही.
हिंसाचारात देशामध्ये आघाडीवर असलेल्या झारखंडमधील वासेपूर गॅग्जप्रमाणे वाल्मीक कराडची बीडमध्ये दहशत आहे. सौर ऊर्जा किंवा अन्य प्रकल्प राबविणाऱ्या कंपन्यांना प्रोटेक्शन मनीसाठी कराडची माणसे धमकावतात. प्रसंगी कामे बंद पाडतात. वासेपूरमधील कोल माफिया व वाल्मीक कराड गँगमध्ये कोणताच फरक नाही. वाळू व लँड माफिया अशीच धनंजयच्या कराड टोळीची बीडमध्ये ओळख आहे. जमीन व खंडणीच्या वादातून आपल्या मार्गात येणाऱ्यांचे काटे काढले जात आहेत. मुंबईचे अभिषेक घोसाळकर, बाबा सिद्दिकी व आता बीडचे संतोष देशमुख लोकप्रतिनिधींना राजकीय हेतूनेच ठार मारण्यात आले आहे. या पॉलिटिकल मर्डर आहेत. त्यासाठी लॉरेन्स बिष्णोई, वाल्मीक कराडसारख्या माफियांचा वापर करून घेतला जात आहे. आपली ‘सत्ता’ टिकविण्यासाठी राजकीय पुढारी काहीही करू शकतात. महाराष्ट्रात सध्या तेच सुरू आहे. साम, दाम, दंड, भेद! त्याशिवाय सत्ता हाती लागत नाही. वारकरी संप्रदायच्या या बीड जिल्हयात टोळ्यांकडून महिन्याला सरासरी दोन-तीन मुडदे तरी पाडले जातात. संत-बाबा यांचा वारसा असलेला हा जिल्हा आता संघटित टोळ्यांनी काबीज केला आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचा, मंत्र्यांचा आशीर्वाद असल्यावर बाहुबलीचे क्रौर्य वाढणार नाही तर काय? झारखंडमधील कोळसा माफियांचा हिंसाचार कमी झाला, परंतु तो आता बीडमध्ये वाढला आहे. याला जबाबदार आमचे राज्यकर्ते आहेत. तेच माफियांना पोसत आहेत. वापरत आहेत. सत्तेत सामील करून घेत आहेत. त्यामुळे उद्या साऱ्या महाराष्ट्राचा ‘बीड’ झाल्यास कुणी आश्चर्य वाटून घेऊ नये.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List