बेकऱ्यांमध्ये आता इलेक्ट्रिक, सीएनजी शेगडी बंधनकारक; मुंबईतील 650 बेकऱ्यांना महापालिकेची नोटीस
मुंबईमधील प्रदूषणकारी बेकऱ्यांमुळे हवेची गुणवत्ता खालावण्यास हातभार लागत आहे. त्यामुळे मुंबईतील सर्व बेकऱ्यांमध्ये आता इलेक्ट्रिक किंवा सीएनजी शेगडी बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. येत्या एक वर्षात याबाबत कार्यवाही करणे बेकरी मालकांना बंधनकारक राहणार आहे. यासाठी पालिकेने कठोर निर्णय घेताना 650 बेकऱ्यांना नोटीस बजावली असून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता खालावत असून प्रदूषण वाढले आहे. यामध्ये मुंबईत ठिकठिकाणी सुरू असलेले इमारतींचे बांधकाम, रस्त्यांच्या कामातून उडणारी धूळ कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय मुंबईत असणाऱ्या 1200 हून अधिक बेकऱ्यांमध्ये जाळण्यात येणाऱ्या लाकूड, भुशामुळे निर्माण होणाऱ्या विषारी धुरामुळे प्रदूषण वाढत असल्याचे समोर आले आहे. मुंबईतील बेकऱ्यांमध्ये निम्म्या बेकऱ्या बेकायदेशीर आहेत. मुंबई महापालिकेने 2007 पासून इलेक्ट्रिक वापराच्या अटीवर सुमारे 350 बेकऱ्यांना परवानगी दिली आहे. असे असताना निम्म्या बेकऱ्यांमध्ये इंधन म्हणून लाकडाचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. लाकडाच्या वापरामुळे प्रदूषण निर्माण होते व ते आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत आहे. लाकडाचा वापर होत असल्याने हानीकारक अशा प्रदूषकांचे उत्सर्जन होते. यामध्ये पार्टिक्युलेट मॅटर, मिथेन, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि व्होलटाइल ऑर्गेनिक पंपाऊंड्स यांसारख्या प्रदूषक उत्सर्जनामुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत आहे.
कायदेशीर कारवाईनंतर टाळे लागणार
बेकऱ्यांमध्ये इलेक्ट्रिक किंवा सीएनजीवर आधारित शेगडी बसवण्याचे आवाहन पालिकेकडून वारंवार केले जात आहे, मात्र बेकरी मालकांकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे 650 बेकऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून वर्षभरात कार्यवाही केली नाही तर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. यामध्ये अखेरच्या कारवाईत बेकरीला टाळे लागण्याची कारवाई होऊ शकते.
बेकऱ्यांमधील लाकडांच्या वापराचा धोका
बेकऱ्यांमध्ये लाकडाचा वापर होत असल्याने हानीकारक अशा प्रदूषकांचे उत्सर्जन होते. ज्यांचे सूक्ष्म कण फुप्फुसांमध्ये अगदी आतपर्यंत पोहचत असल्यामुळे श्वसनाच्या, हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांना कारणीभूत ठरतात. भंगार लाकूड, खराब प्लायवूड जाळल्याने तयार होणारे व्हिओसीज् हे कर्करोग, अस्थमा आणि इतर अनेक आजारांसाठी कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List