Mumbai Boat Capsized : मुंबईच्या समुद्रात स्टंट मारण्याच्या नादात एवढा मोठा भीषण अपघात का? 13 जणांचा मृत्यू
मुंबईच्या समुद्रात बुधवारी संध्याकाळी एक भीषण अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. यात तीन जण नौदलाचे आणि दहा सामान्य नागरिक आहेत. नीलकमल ही बोट गेट ऑफ इंडियावरुन एलिफंटाच्या दिशेने निघाली होती. या बोटीची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता 80 आहे. परंतु त्या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक म्हणजे 100 पेक्षा जास्त प्रवासी होते. नीलकमल बोट एलिफंटाच्या दिशेने जात असताना समुद्रात एका पॉइंटवर अचानक नौदलाची स्पीड बोट येऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, लगेच बोटीत पाणी भरण्यास सुरुवात झाली. अवघ्या काही मिनिटात नीलकमल बोट समुद्रात बुडाली. अपघाताची माहिती मिळताच लगेच नौदल, तट रक्षक दल आणि मरीन पोलिसांनी बचाव कार्य सुरु केलं. अन्य बोटींसह हेलिकॉप्टर बचावासाठी तैनात करण्यात आलं व अन्य प्रवाशांचे प्राण वाचवले.
मुंबईच्या समुद्रात झालेल्या या अपघाताप्रकरणी नेव्हीच्या पेट्रोलिंग बोटीवरील अधिकारी आणि संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे. नाथाराम चौधरी, श्रवण कुमार, जितू चौधरी हे बुडलेल्या नीलकमल बोटीवर होते. त्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर या फिर्यादींनी टीव्ही 9 मराठीशी बातचीत केली. नेव्हीच्या स्पीड बोटीवरील लोक स्टंट मारत असल्याचे फिर्यादीकडून सांगण्यात आलं. त्यांनी आमच्या बोटीला धडक मारताच पाच मिनिटात बोटीत पाणी भरायला सुरुवात झाली. ही टक्कर झाल्यानंतर मोठा आवाज आला आणि सर्वजण घाबरले असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
स्पीड बोट चालवत कोण होतं?
नेव्ही स्पीड बोट टो करून घेऊन गेले आहेत. तपासात त्या बोटाची पाहणी पोलिसांसाठी महत्त्वाची असणार आहे. नौदलाच्या स्पीड बोटीवरील तिघांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर आहे. दोघांची प्रकृती स्थिर असून यात नेमकी स्पीड बोट कोण चालवत होतं, हे नौदलाने अजून कन्फर्म केलेलं नाही. यात काही बोट टेस्टिंगवाले होते.
अपघात कशामुळे झाला, नौदलाने सांगितलं
मुंबई बंदरात स्पीड बोटीच्या इंजिनाची तपासणी सुरु होती. यावेळी इंजिनात बिघाड झाल्यामुळे स्पीड बोटीचा कंट्रोल सुटला व ती प्रवासी बोटीला धडकली असं नौदलाकडून सांगण्यात आलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List