अमित शहांवर कारवाई हवी; नाहीतर भाजप, मोदींनी सत्ता सोडावी! उद्धव ठाकरे कडाडले
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून देशात संतापाची लाट उसळलेली आहे. यासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत अमित शहा यांच्या वक्तव्याचा कडक शब्दात समाचार घेतला. ‘घटनाकर्त्यांचा अपमान करणाऱ्या अमित शहांना भाजप आणि मोदी जर अभय देणार असतील तर भाजप आणि मोदींना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी एकतर अमित शहांवर कारवाई करावी नाहीतर मोदींनी सत्ता सोडावी, अशा स्पष्ट शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावलं आहे.
‘मातोश्री’ येथील पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या उद्दामपणावर संताप व्यक्त करत जोरदार हल्ला चढवला. डॉ. आंबेडकरांविषयी अमित शहांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांनी भाजपला लक्ष्य केलं. ‘स्वातंत्र्याला आता 75 वर्ष झाली आणि त्या निमित्त संविधानावर चर्चा सुरू असताना ज्यांनी संविधान आपल्याला दिलं त्या आंबेडकरांबद्दल, बाबासाहेबांबद्दल, आपल्या महामानवाबद्दल अमित शहा सारखा एखादा माणूस एवढ्या उद्दामपणे आणि तुच्छतेने बोलू कसा शकतो, याचं उत्तर मिळालं पाहिजे. नाहीतर भाजपला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. घटनाकर्त्यांचा अपमान करणाऱ्याला जर का ते अभय देणार असतील तर मोदींनी सुद्धा सत्तेवर राहता कामा नये. त्यांनी एकतर अमित शहांवर कारवाई करावी नाहीतर मोदींनी सत्ता सोडावी’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘भाजपचं ढोंग आता उघड पडलेलं आहे. भाजपच्या हृदयातलं काळं हे बाहेर आलेलं आहे. आता तरी महाराष्ट्राने आणि देशाने शहाणं झालं पाहिजे. आम्ही जे लोकसभेच्या वेळेला म्हणत होतो यांना संविधान बदलायचं आहे, दुर्दैवं असं की संसदेत चर्चा ही संविधानावरच सुरू असतानाच अमित शहांकडून हे वक्तव्य आलं आहे’.
भाजपच्या ढोंगावरचा बुरखा पूर्णपणे फाटला!
‘महाराष्ट्रातले उद्योग ते ओरबाडून नेले अजूनही नेताहेत. मुंबईचं महत्त्व मारायला बघताहेत आणि आता तर कहर झाला. काल आपल्या देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे एकेकाळचे अध्यक्ष अमित शहा यांनी अत्यंत उर्मटपणाने देशाला ज्यांनी घटना दिली, संविधान दिलं, त्या महाराष्ट्राच्या सुपुत्राचा, महाराष्ट्रातल्या महामानवाचा, देशातल्या महामानवाचा ज्याप्रकारे उल्लेख केला की, ‘आंबेडकर, आंबेडकर एक फॅशन होगयी है…’ तो व्हिडीओ माझ्याकडे आहे. आंबेडकर ही फॅशन झाली आहे, त्याच्या ऐवजी जर का देवाचं नाव घेतलं असतं तर सात जन्मांपर्यंत स्वर्ग मिळाला असता, असा आत्यंतिक हिणकस आणि उद्दाम उल्लेख त्यांनी केला आहे, हे पाहता भाजपच्या ढोंगावरचा बुरखा पूर्णपणे फाटलेला आहे’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मिंधे, अजित पवार आणि रामदास आठवले काय करताहेत? राजीनामा देणार का?
‘हा अत्यंत उद्दामपणा आहे आणि भाजपचं ढोंग समोर आलं आहे. भाजपचं हिंदुत्व म्हणजे मुहँ मे राम बगल में छुरी असं आहे. यांना महाराष्ट्र खतम करायचा आहे. भविष्यामध्ये आपल्या खेरीज कुणीही या देशात जन्माला आलाच नव्हाता असं त्यांना दाखवायचं आहे. नेहरू, नेहरू करता करता आता हे आंबेडकरांवरती बोलायला लागले आहेत. एवढी यांची हिंमत वाढली आहे. आता मला भाजपला पाठिंबा देणारे इतर पक्ष आहेत, मग ते नितीशकुमार असतील चंद्राबाबू आहेत विशेष म्हणजे रामदास आठवले काय करताहेत? रामदास आठवले राजीनामा देणार आहेत का? अगदी महाराष्ट्रात सुद्धा जे मिंधे गेले आहेत, अजित पवार गेले आहेत त्यांना सुद्धा बाबासाहेबांचा अपमान मान्य आहे का? खरंच आंबेडकर ही फॅशन झाली आहे का, ते यांना मान्य आहे का? असे बोचरे सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.
भाजप आणि संघानं खुलासा करावा!
संसदेत अतिशय जबाबदारीने विधान करावं लागतं, त्यामुळे अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरचे विधान संघाच्या सांगण्यावरून तर नाही ना असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र आता सहनशीलतेच्या पलिकडे गेला आहे आणि भाजपने आणि संघाने सुद्धा आता खुलासा केला पाहिजे की हे तुम्ही अमित शहांकडून बोलवून घेतलं आहे का? कारण अदानीचं नाव घेतल्यावर आभाळ कोसळावं तसा भाजप कोसळतो. जो अदानीवर आरोप करतो त्याच्यावर भाजप कोसळतो. आता बाबासाहेबांचा उल्लेख असा केल्यानंतर भाजप अमित शहांवर कारवाई करणार आहे का? नाही तर मग भाजपचं ढोंग आता उघड पडलेलं आहे. भाजपच्या हृदयातलं काळं हे बाहेर आलेलं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
काँग्रेस नेत्यांच्या विधानांवरून प्रतिप्रश्न करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा इतरांनी शेण खाल्लं म्हणून तुम्ही शेण खाणार का? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी केला.
अमित शहांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे, भाजपने माफी मागावी – आदित्य ठाकरे
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List