Border Gavaskar Trophy – पावसाने गेम केला! गॅबा कसोटी अनिर्णीत, पुढचा मुक्काम MCG स्टेडियमवर
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये गॅबा कसोटीमध्ये अटीतटीची लढत पहायला मिळाली. अष्टपैलू रविंद्र जडेजा (77 धावा), वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा (10 धावा) आणि आकाश दीप (31 धावा) यांनी केलेली बचावात्मक फलंदाजी टीम इंडियाला फॉलोऑन पासून वाचवण्यासाठी महत्त्वाची ठरली. त्यामुळे चौथ्या दिवशी पावसाच्या लपंडावात खेळ पार पडला आणि टीम इंडियाने 9 गड्यांच्या मोबदल्यात 252 धावांपर्यंत मजल मारली होती. परंतु पाचव्या दिवशी पुन्हा एकदा पावसाने खोडा घातल्यामुळे अखेर सामना अनिर्णीत सुटला.
टीम इंडियाचा पहिला डाव 260 धावांवर संपूष्टात आला होता. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 7 गड्यांच्या मोबदल्यात 89 धावा करत डाव घोषित करत टीम इंडियाला जिंकण्यासाठी 275 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान टीम इंडियाला कमितकमी 54 षटकांमध्ये पूर्ण करायचे होते. आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी यशस्वी जयस्वाल आणि के.एल. राहुल ही सलामीची जोडी मैदानात उतरली होती. दोघांनी मिळून 8 धावा केल्या आणि पावसाने पुन्हा एकदा मध्यस्थी करत खेळ थांबवला. अंधुक प्रकाश आणि पावसाच्या व्यत्ययामुळे अखेर सामना अनिर्णित घोषित करण्यात आला. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेडला सामाविराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. ट्रॅव्हिस हेडने पहिल्या डावात 151 धावांची खेळी केली होती.
दैनिक सामनाचे अधिकृत WhatsApp चॅनेल फॉलो करा! Follow:https://www.saamana.com/whatsapp
पर्थ येथे पार पडलेला पहिला कसोटी सामना टीम इंडियाने जिंकला होता. तर एडलेड कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाने पुनरागमन करत टीम इंडियाच्या विजयी रथाला ब्रेक लावला आणि कसोटी जिंकली. त्यामुळे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले. त्यामुळे तिसरा सामना जिंकून 2-1 अशी आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक होते. परंतु पहिल्या दिवसापासूनच पावसाने वारंवार व्यत्यय आणल्यामुळे पूर्ण सामना होऊ शकला नाही. आता चौथा कसोटी सामना 26 ते 30 डिसेंबर या कालावधीत मेलबर्न येथे पार पडणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List