अदानीवरून लक्ष भरकटवण्यासाठी ‘वन नेशन, वन इलेक्शन’! उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला
लोकसभेत आज ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक सादर करण्यात आले. त्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. अदानी मुद्दय़ावरून लक्ष भरकटवण्यासाठीच वन नेशन वन इलेक्शनसारखे विषय आणले जात आहेत, असा आरोप त्यांनी केला.
नाराजांचे बार मोठ्याने वाजताहेत
विधानसभा निवडणुकीचा जो निकाल आला तो अनाकलनीय होता. याला ईव्हीएम सरकार बोलतात. या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, मात्र वजाबाकीचीच चर्चा अधिक आहे. नाराजांचे बार अधिक मोठय़ाने वाजत आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. वन नेशन, वन इलेक्शन म्हणता, मग राष्ट्रपतींची निवड निवडणूक प्रक्रियेतून होते तशी निवडणूक आयुक्तांचीही केली पाहिजे, यावर उद्धव ठाकरे यांनी या वेळी जोर दिला. निवडणूक आयुक्तांची सरकारकडून नियुक्ती होण्याऐवजी तेसुद्धा निवडणूक प्रक्रियेतून जायला हवेत असे ते म्हणाले. लोकशाहीत मतदाराला त्याचे मत शेवटपर्यंत कुठे जातेय हे कळलेच पाहिजे आणि त्यासाठी मतदान प्रक्रिया पारदर्शक असावी. ती पारदर्शक झाल्याशिवाय वन नेशन, वन इलेक्शन व्हायला नको, असे स्पष्ट मतही त्यांनी या वेळी मांडले.
उद्धव ठाकरे यांनी आज हिवाळी अधिवेशनात हजेरी लावली. विधान परिषदेच्या कामकाजातही त्यांनी भाग घेतला. त्यानंतर विधान भवन आवारातील शिवसेना कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महायुतीमध्ये मंत्रिपदासाठी असलेली नाराजी, लाडकी बहीण योजना, वन नेशन, वन इलेक्शन आदी मुद्दय़ांवर त्यांनी भाष्य करतानाच महायुती सरकारवरही जोरदार हल्ला चढवला.
मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांची ओळख करून देण्याची प्रथा असते, पण या वेळी पहिल्यांदाच असे घडले असेल की, ज्यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत, ज्यांच्यावर ईडी-इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या आहेत अशांचा परिचय मुख्यमंत्र्यांना सन्माननीय मंत्री म्हणून करून द्यावा लागला, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी गुन्हेगार मंत्र्यांवर निशाणा साधला. माननीय मंत्र्यांनी शाश्वत धर्म असे म्हटले होते. हा कोणता धर्म आहे हे तेच सांगू शकतील, असा चिमटाही त्यांनी काढला.
गंमत म्हणून अधिवेशन घेताहेत
उद्धव ठाकरे यांनी या वेळी राज्यपालांच्या अभिभाषणावर खेद व्यक्त केला. खेद व्यक्त करण्याचा अधिकार विरोधी पक्षाला आहे असे ते म्हणाले. राज्यपालांच्या भाषणात पर्यावरणाबद्दल पुसटसा उल्लेख आहे. त्यात ते एक समिती नेमणार आहेत. त्या समितीमध्ये नेमके कोण असेल, किती तज्ञ असतील, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. आरे कारशेडसाठी झाडे कापली, आता दुसऱया कारशेडसाठी 1400 झाडांची कत्तल केली जाणार आहे. त्या कत्तलीला ही समिती परवानगी देणार का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. महिलांच्या सुरक्षेबाबत हे सरकार काही करणार आहे का? असा प्रश्न उपस्थित करतानाच गंमत म्हणून सरकार हे अधिवेशन घेतेय, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.
आजच विधान परिषदेत एका घटनेबाबत मुद्दा मांडला गेला. नागपुरात मास्क घालून लुटमार केली गेली, परंतु त्याचा एफआयआर घ्यायला पोलिसांनी विलंब केला. असेच घडत असेल तर ही लोकशाहीची थट्टाच आहे, असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. राक्षसी बहुमत मिळूनही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ठरवायला अनेक दिवस लागले. आता मंत्रिमंडळ विस्तारालाही वेळ लागला, असे उद्धव ठाकरे म्हणाले. कोणताही मंत्री सभागृहात उत्तर देत नाही. त्यामुळे खातेवाटप लवकर जाहीर झाले पाहिजे, असेही ते म्हणाले.
पत्रकार परिषदेत मांडत असलेले मुद्दे सभागृहात का मांडत नाहीत असे माध्यमांनी या वेळी उद्धव ठाकरे यांना विचारले. त्यावर जनतेच्या सभागृहात आपण प्रश्न मांडले आहेत. सर्वच प्रश्न पक्षप्रमुख मांडत नाहीत. शिवसेनेचे आमदार आहेत ते प्रश्न मांडतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मोदी पंतप्रधान असले तरी खासदारही आहेत. ते किती वेळा सभागृहात उपस्थित असतात, असा प्रतिसवालही उद्धव ठाकरे यांनी केला.
भुजबळ आणि नाराजांबद्दल वाईट वाटते
मंत्रिमंडळातून डावलले गेल्याने अजित पवार गटाचे छगन भुजबळ नाराज आहेत. ते अजित पवार गटाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याच्याही चर्चा आहेत. ‘जहा नहीं चैना, वहा नही रहना’ अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली होती. त्याबाबत उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, भुजबळ यांच्याबद्दल वाईट वाटले. अनेकांबद्दल वाटतेय. काहींना घट्ट झालेली जॅकेट्स आता तरी घालायला मिळाली. काहींची जॅकेट्स अजूनही वाट बघताहेत. त्यांच्याबद्दल आपल्याला सहानुभूती आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
भुजबळ शिवसेनेच्या संपर्कात आहेत का? अशा प्रश्नाला उत्तर देताना, भुजबळ हे आता आपल्या संपर्कात नाहीत. मात्र ते अधूनमधून संपर्कात असतात, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले.
नाराजांना अनुभवातून शिकू द्या, मग बघू
महायुतीमधील नाराजांबाबत माध्यमांनी या वेळी विचारणा केली. नाराजांना शिवसेनेत यायचे असेल तर घेणार का, असेही विचारले गेले. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, अनुभवासारखा दुसरा गुरू नाही. त्यांच्या अनुभवातूनच त्यांना शिकू द्या. ते काय धडा शिकताहेत ते बघूया. त्यानंतर त्यांना त्याचे सर्टिफिकेट मिळेल…मग बघू, असे उद्धव ठाकरे म्हणताच पत्रकार परिषदेत हशा पिकला.
मंत्रिमंडळ हा फिरता चषक आहे का? मग अडीच वर्षांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही बदला
महायुती सरकारमधील मंत्र्यांचे मंत्रीपद अडीच वर्षांसाठीच असणार आहे. त्यानंतर दुसऱया आमदारांना मंत्रीपद दिले जाणार आहे. यावरूनही उद्धव ठाकरे यांनी सरकारला सुनावले. क्रिकेटमध्ये फिरता चषक असतो हे माहीत आहे, पण मंत्रिमंडळातला फिरता चषक पहिल्यांदाच पाहतोय, असा चिमटा त्यांनी काढला. मंत्री बदलणार तसे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही अडीच वर्षांनी बदलणार का? असा बोचरा सवालही त्यांनी केला.
नेहरू-नेहरू करत रडू नका… आधी सावरकरांना भारतरत्न द्या
काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये सावरकर व नेहरूंवरून एकमेकांवर होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपाबाबत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. काँग्रेस व भाजपने सावरकर-सावरकर आणि नेहरू-नेहरू बोलणे सोडायला हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी नेहरूंचे रडगाणे बंद करावे. मुळात भाजप सरकार सावरकरांना भारतरत्न का देत नाही, अशी विचारणा करताना, आधी सावरकरांना भारतरत्न द्या, या मागणीचा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी केला.
लाडक्या बहिणींना आताच निकष का लावताय?
मिंधे सरकारची योजना होती लाडकी बहीण, आता नवे सरकार आल्यानंतर लाडके आमदार आणि नाराज आमदार यांची चर्चा सुरू झाली आहे, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. ते पुढे म्हणाले की, लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये पहिले हप्ते जमा झाले. निवडणुकीसाठी या योजनेला स्थगिती देण्यात आली होती. आता निवडणूक झाली, आचारसंहिता संपली. त्यामुळे सरकारने तत्काळ ही योजना सुरू करावी आणि लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे 2100 रुपये जमा करावेत. लाडकी बहीण योजनेवर काही निकष लावणार अशा बातम्या येत होत्या. आता हे निकष बाजूला ठेवून आवडती-नावडती न करता लाडक्या बहिणींना पैसे देण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
फडणवीसांसमोर शिवसेनेचे 20 काफी आहेत
महायुतीच्या मोठय़ा बहुमतातील सरकारसमोर शिवसेनेचे फक्त 20 आमदारच विधानसभेत आहेत असा मुद्दा या वेळी प्रसारमाध्यमांनी उपस्थित केला. त्यावर फडणवीसांसमोर शिवसेनेचे 20 काफी आहेत, असे मोठय़ा आत्मविश्वासाने उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
वन नेशन, वन इलेक्शन म्हणता, मग राष्ट्रपतींची निवड निवडणूक प्रक्रियेतून होते तशीच निवडणूक आयुक्तांचीही केली पाहिजे, अशी आग्रही मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली.
महायुती सत्तेवर कशी आली, जनतेच्या दरबारात आवाज उठवणार
महायुती सरकार हे ईव्हीएम सरकार आहे. ईव्हीएमवर शिवसेनेचा संशय कायम आहे यात वादच नाही. महायुती सत्तेवर कशी आली याबद्दल जनतेच्या माध्यमातून शिवसेना आवाज उठवेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला.
उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीही यावेळी भेट घेतली. प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी एक राजकीय पक्ष म्हणून ही केवळ सदिच्छा भेट होती, असे स्पष्ट केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List