लोकशाही, स्वातंत्र्य उद्ध्वस्त करण्याच्या मोदींच्या योजना; ‘वन नेशन, वन इलेक्शन’वरून संजय राऊत यांची टीका
देशाच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा असलेल्या ‘एक देश, एक निवडणूक’ या विधेयकाला अखेर केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. देशात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे. 2029 पासून याची अंमलबजावणी होऊ शकते अशी चर्चा आहे. मात्र तोपर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान राहतील का? असा खडा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना केला.
देशामध्ये लोकशाही, स्वातंत्र्य उद्ध्वस्त करण्याच्या मोदींच्या ज्या योजना आहेत त्यात वन नेशन, वन इलेक्शनचाही समावेश आहे. आपल्या देशात संघराज्यपद्धती आहे. प्रत्येक राज्याची सामाजिक, भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. जम्मू-काश्मीर, ईशान्येकडील राज्यात तुम्ही लोकसभेबरोबर विधानसभा निवडणूक घेऊ शकत नाही, असे राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, राज्यांचे प्रश्न वेगळे असतात आणि राष्ट्रीय प्रश्न वेगळे असतात. त्यानुसार लोकांनी विचारपूर्वक मतदान करायचे असते. हे गेले आपण 70-75 वर्ष पाहतोय. आजही तुम्ही काही राज्यांमध्ये 7-7 टप्प्यात निवडणूक घेता. तुमची व्यवस्था आणि सोय पाहण्यासाठी, स्वार्थासाठी वन नेशन, वन इलेक्शन पद्धतीने निवडणुका घ्यायच्या आहेत, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.
आजही तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अद्याप घेऊ शकलेला नाहीत. हरण्याची भीती वाटत असल्याने महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या नाहीत. वन नेशन, वन इलेक्शन हे बील आणले, कॅबिनेटने मंजुरही केले. त्यांच्याकडे बहुमत आहे, दोन टेकू आहेत, त्यांना पक्ष फोडण्याचा आणि बहुमत प्राप्त करण्याचा अनुभव आहे. तरीही 2029 पर्यंत मोदी पंतप्रधान राहतील का? असा सवाल राऊत यांनी केला..
ज्यांनी ज्यांनी देशाच्या संविधानावर आणि संघराज्य व्यवस्थेवर हल्ला केलेला आहे, इतिहासाने त्यांना माफ केले नाही आणि पुढे जाऊन ते राजकारणात राहिले नाहीत. शेवटी प्रत्येक गोष्टीला अंत असतो. जगामध्ये असे जे राज्यकर्ते, हुकुमशहा निर्माण झाले त्यांचा अंत अत्यंत वाईट पद्धतीने झाला. हिटलर असो किंवा सद्दाम हुसैन असो या सगळ्यांचा अंत लोकांच्या हातून होतो आणि याला लोकशाही मानतो, असेही ते म्हणाले. तसेच बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा, मतमोजणी सुरू होताच अर्धे भाजपवाले देश सोडून पळून गेले असतील, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List