कोकण रेल्वे दुहेरीकरणाचा प्रस्ताव नाही, माहिती अधिकारातून स्पष्ट
कोकण रेल्वे प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होतो. कोकण रेल्वेवर दुहेरीकरण करण्याची चर्चा होत होती. कोकण रेल्वे मार्गावर दुहेरीकरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे.
गेल्या दोन दशकात कोकण रेल्वेवरील प्रवासी संख्या, रेल्वे गाड्या आणि स्थानकाची संख्या वाढली. मात्र कोकण रेल्वेचे दुहेरीकरण प्रलंबित असल्याने, कोकण रेल्वे प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होतो. भारतीय रेल्वेत कोकण रेल्वेचे विलीनीकरण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जाते. तसेच नुकताच कर्नाटक राज्यातील काही खासदार एकत्र येऊन त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन, या विषयाबाबत चर्चा केली. परंतु अद्याप ठोस निर्णय झाला नाही. तर दुसरीकडे कोकण विकास समितीचे सदस्य अक्षय महापदी यांनी नुकताच माहिती अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्नातून धक्कादायक उत्तरे मिळाली आहेत. अक्षय महापदी यांनी 12 नोव्हेंबर 2024 कोकण रेल्वेचे दुहेरीकरणाबाबत माहिती विचारली. त्यानुसार दुहेरीकरणाबाबत कोणताही प्रस्ताव नसल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. फक्त कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागात रोहा ते वीर 46.8 किमीपर्यंत रेल्वे मार्गाचे ऑगस्ट 2021 रोजी दुहेरीकरण पूर्ण झाले. तर, अन्य भागात टप्पा दुहेरीकरण किंवा पूर्ण दुहेरीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही, असे दोन वेळा रेल्वेकडून स्पष्ट केले आहे.
संपूर्ण देशभरातील रेल्वेचे दुहेरीकरण, तिहेरीकरण, चौपदरीकरण केले जात आहे. मात्र कोकण रेल्वेचा दुहेरीकरण करण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. कोकण रेल्वेचा पसारा हा रोहा ते ठोकुर अशा 740 किमी अंतरापर्यंत पसरलेला आहे. मात्र रोहा ते वीर मार्ग वगळता अन्यत्र दुहेरीकरणाची कामे झाली नाहीत. परिणामी, कोकण रेल्वेची वाढत्या गर्दीला सामावून घेण्याची क्षमता कमी होऊ लागली आहे. मुंबईस्थित कोकणवासियांचे कोकणात जाताना प्रचंड हाल होतात. तर उशिरा रेल्वे गाडय़ा धावणे, जादा रेल्वे गाडय़ा नसणे, मर्यादित स्थानकांना थांबा असणे, अवेळी विशेष रेल्वे गाडय़ा चालवणे अशा समस्यांना प्रवाशांना सामोरे जावे लागते. तसेच कोकणातील अनेक गावांचा विकास करण्यासाठी अतिरिक्त स्थानके उभारण्याची मागणी आहे. याबाबत महापदी यांना विचारले असता, अतिरिक्त स्थानके उभारण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे माहिती अधिकारातून उत्तर देण्यात आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List