Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना बंद…कोणी केला मोठा दावा?
Mukhyamantri Ladki Bahin Yojana: महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. ही योजना लोकप्रिय ठरली आहे. आता या योजनेसंदर्भात काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मोठा दावा बुधवारी केला. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, महायुती सरकारची लाडकी बहीण योजना बंद केली आहे. आता निवडणूक आयोगाचे कारण देऊन ही योजना बंद केली आहे. त्यांच्याकडे पैसे नाही. आता लाडक्या बहिणांना एक पैसा मिळणार नाही. ही योजना फक्त निवडणुकीसाठी होती, असा दावा चेन्निथला यांनी केला. तसेच महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय घेतले. परंतु त्यातील एकही निर्णय यशस्वी होणार नाही, असे त्यांनी म्हटले.
मविआमध्ये मतभेद नाही
महाविकास आघाडी एकत्र एका उद्देशावर निवडणूक लढवत आहे. मविआने 288 जागांवर उमेदवार दिले आहे. महाविकास आघाडी सर्व उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. मविआत मतभेद नाही. आज, उद्या काँग्रेसचे आणि मविआतील सर्व बंडखोर उमेदवार अर्ज मागे घेणार आहे. आम्ही कोणत्याही बंडखोरास ए आणि बी फॉर्म दिला नाही. पक्षाने दिलेल्या यादीनुसारच उमेदवार असणार आहे. त्यानुसारच प्रचार केला जाणार आहे. महायुती सरकार अपयशी ठरले आहे. या सरकारने लूट जनतेची केली आहे, असे चेन्निथला यांनी म्हटले.
महायुतीत भाजप मित्रपक्षांना संपवतोय
महायुतीत जोरदार भांडणे सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कोट्यातून भाजप नेते निवडणूक लढवत आहे. राज्यात ही विचित्र युती झाली आहे. या पद्धतीची युती आम्ही कधी पाहिली नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीतून निवडणूक भाजपच लढवत आहे. महायुती संपली आहे.
महायुतीचे कोणतेही अस्तित्व राहिले नाही. भाजपने एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला संपवले आहे. भाजप मित्रपक्षांना संपवण्याचे काम करत असल्याचा हा स्पष्ट संदेश आहे. आम्ही मात्र असे केले नाही. आम्ही शिवसेना उबाठाला आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांच्यासह इतर छोट्या पक्षांनाही स्थान दिले आहे. आमची समाजवादी पक्षाशी चर्चा सुरु आहे. 4 तारखेपूर्वी समाजवादी पक्षाचा विषय संपलेला असणार आहे, असे चेन्निथला यांनी म्हटले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List