मोदींच्या कार्यक्रमात महिलांना बुरशी लागलेले जेवण
वर्धा येथे पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बुरशी लागलेली भाजी आणि वास मारणाऱ्या पुऱ्या वाटण्यात आल्या! त्यामुळे संतापलेल्या महिलांनी जेवणाचे पाकिट तेथेच टाकून दिले.
पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप आणि अमरावती येथील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कच्या उद्घाटनाचा एकत्रित कार्यक्रम वर्धा येथे आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी संपूर्ण विदर्भातून महिलांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी जमवण्यात आली. लांब पल्ल्याहून येणाऱ्या महिला आदल्या दिवशीच वर्ध्यात दाखल झाल्या. कार्यक्रम स्थळ आणि महिलांची व्यवस्था करण्यात आलेले ठिकाण यात पाच किमीचे अंतर असल्याने महिलांना बरीच पायपीट करावी लागली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. त्यानंतर लगेचच उपस्थित महिलांना पुरी, भाजी, सोनपापडी असलेले जेवणाचे पाकीट देण्यात आले. परंतु पाकिटातील बटाटय़ाच्या भाजीला बुरशी लागलेली होती तर पुऱ्यांना जीवघेणा उग्र वास येत होता. त्यामुळे महिलांनी जेवणाची पाकिटे टाकून दिली. गुरुवारी अधिकाऱ्यांनी जेवण उत्कृष्ट असून अन्न आणि औषध प्रशासनाने प्रमाणित केल्यानंतरच ते लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले होते.
किसान अभियान, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी नजरकैदेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्धा जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भव्यदिव्य सभा घेण्याऐवजी शेतकऱ्यांच्या पिकांना भाव देण्याची तसेच विविध प्रश्नांवर प्रश्न उपस्थित करीत महाविकास आघाडीतील नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाब विचारला होता. त्यामुळे मोदींच्या या कार्यक्रमात कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी किसान अभियानचे अविनाश काकडे तसेच संभाजी ब्रिगेडचे तुषार उमाळे या दोघांना नजरपैदेत ठेवण्यात आले. या दोघांकडून हमीपत्रदेखील लिहून घेण्यात आले. दरम्यान, शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करणाऱ्या शेतकरी नेत्यांना नजरपैदेत ठेवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
जेवणाच्या व्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी गटविकास अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती. खराब जेवण लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले तेव्हा हा अधिकारी झोपला होता काय, असा सवाल करण्यात येत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List