Pahalgam Terror Attack : अमित शाह यांनी राजीनामा दिला पाहिजे का? शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया काय?
मंगळवारी पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेमध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरात संतापाची लाट आहे, या सर्व पार्श्वभूमीवर गुरुवारी सरकारने सर्व पक्षीय बैठक बोलावली होती, आम्ही सरकारसोबत असून, सरकारच्या प्रत्येक कृतीला आमचा पाठिंबा असल्याचं या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता या हल्ल्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
दोन तीन गोष्टी आहेत. काल काश्मीरमध्ये जे झालं, त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व देशवासियांनी एका विचाराने सरकार बरोबर राहिलं पाहिजे. त्यात राजकारण आणायचं नाही. अतिरेक्यांनी भारताविरोधात कारवाई केली, देशविरोधात जेव्हा कारवाई होते, तेव्हा तिथे राजकीय मतभेद ठेवायचे नसतात. काल सर्व पक्षीय बैठक होती. आमच्या पक्षाकडून सुप्रिया सुळे या बैठकीला उपस्थित होत्या, सर्व राजकीय पक्षांनी या प्रश्नावर केंद्र सरकारला सहकार्य करण्याची भूमिका घेतली याचा आनंद आहे. माझी विनंती आहे की, जे काही निर्णय घेतले जातील त्यात आम्ही सरकार सोबत आहोत, पण सरकारने देखील हे अधिक गांभीर्याने घेतलं पाहिजे.
दरम्यान आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असं सांगितलं जात होतं. पण कुठे ना कुठे तरी अजूनही कमतरता आहे. ती कमतरता घालवली पाहिजे. देशावर हल्ला झाला असेल, सरकार गांभीर्याने निर्णय घेत असेल आणि कमतरता आहे असं मान्य करत असेल तर तातडीने ती कमतरता दूर केली पाहिजे. त्याही कामात आम्ही सरकारला सहकार्य करू असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा दिला पाहिजे का? यावर देखील शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कालच्या बैठकीत चूक झाल्याचं सांगितलं. आता ज्यांनी भारतावर हल्ला केला, त्यांना शोधून त्यांच्यावर सख्त कारवाई करण्याची गरज आहे. त्यामुळे कुणाला काढा असं मी आज बोलणार नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List