हिंदू धर्मातील लग्नामुळे आजही होते ट्रोलिंग; सैफ अली खानच्या बहिणीकडून दु:ख व्यक्त
अभिनेत्री शर्मिला टागोर यांची मुलगी आणि सैफ अली खानची बहीण सोहा अली खानने 2015 मध्ये अभिनेता कुणाल खेमूशी लग्न केलं. सोहा मुस्लीम आणि कुणाल हिंदू असल्याने अनेकदा त्यांना आंतरधर्मीय लग्नावरून ट्रोलिंगचा सामोरं जावं लागलंय. “मी जेव्हा कधी दिवाळी किंवा होळी साजरा करतानाचे फोटो पोस्ट केले की ट्रोलर्स विचारतात, मी किती रोजाचे उपवास केले”, असं ती म्हणाली. सोशल मीडियावर होणाऱ्या या टीकेबद्दल ती नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली. कुणाल आणि सोहा हे एकमेकांच्या धर्माचा खूप आदर करताना दिसून येतात. मुलगी इनायालासुद्धा त्यांनी दोन्ही धर्माचे संस्कार आणि सण-उत्सव साजरा करण्याविषयी शिकवलंय. परंतु हीच गोष्ट ठराविक लोकांना पसंत पडत नाही.
‘इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘स्क्रीन’ला दिलेल्या मुलाखतीत सोहा याविषयी म्हणाली, “आता मी जाड चामडीची बनली आहे. माझ्यावर ट्रोलिंगचा विशेष परिणाम होत नाही. पण एका गोष्टीचं मला खूप नवल वाटतं की, जेव्हा मी एखादी पोस्ट शेअर करते तेव्हा लोक माझ्या धर्मावरून कमेंट्स करू लागतात. कारण मी एका हिंदू कुटुंबात लग्न केलंय, माझ्या आईचं आडनाव हिंदू आहे आणि तिने मुस्लीम व्यक्तीशी (मन्सूर अली खान पतौडी) लग्न केलंय. दिवाळी किंवा होळीनिमित्त मी जेव्हा एखादी पोस्ट लिहिते किंवा फोटो शेअर करते तेव्हा ट्रोलर्स प्रश्न विचारतात, तू किती रोजाचे उपवास केले? तू कोणत्या प्रकारची मुस्लीम आहेस? असे कमेंट्स वाचून मला आता त्रास होत नाही. पण ते माझ्या निदर्शनास आवर्जून येतात.”
सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांची भेट ‘ढुंढते रह जाओगे’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. 25 जानेवारी 2015 रोजी सोहा आणि कुणालने लग्न केलं. सोहा आणि कुणालने यावर्षी लग्नाचा दहावा वाढदिवस साजरा केला. या दोघांना इनाया नौमी खेमू ही मुलगी असून 2017 मध्ये तिचा जन्म झाला. सोहा आणि कुणालने ज्याप्रकारे इनायाचं संगोपन केलंय, तिला शिकवण दिली आहे.. ते पाहून अनेकजण त्यांचं कौतुक करतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List