उद्धव ठाकरे, अजित पवारदेखील ‘गद्दार’ म्हणाले, त्यांच्यावर गुन्हा का नाही? कुणाल कामराच्या वकिलांचा सवाल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विडंबनात्मक गाणं सादर केल्याप्रकरणी कॉमेडियन कुणाल कामराविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी त्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज (बुधवार) सुनावणी झाली. कुणालच्या वकिलांनी कोर्टात आपली बाजू मांडली. “या प्रकरणात एका कॉमेडियनच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. एका गटासाठी सरकारी यंत्रणांचा वापर केला गेलाय. यंत्रणांचा वापर करून एका व्यक्तीला घाबरवण्याचा आणि दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आलाय”, असे आरोप कामराच्या वकिलांनी केले आहेत. त्याचप्रमाणे कुणालविरोधात सुरू असलेला तपास पूर्णपणे थांबवण्याची मागणी त्याचे वकील नवरोज सिरवी यांनी केली आहे.
कामराच्या वकिलांचा युक्तीवाद-
“याप्रकरणी पोलिसांनी जी कलमं लावली आहेत, ती कायदाबाह्य आहेत. तक्रारदार मुरजी पटेल हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. त्यामुळे हे प्रकरण ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’मध्ये मोडतं. कुणाल कामराने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या विरोधात वक्तव्य केल्याचा पटेल यांचा आरोप हास्यास्पद आहे. शिवसेना शिवसेनेतून बाहेर पडली आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादीतून बाहेर पडली, असा त्याच्या गाण्यात उल्लेख होता. या प्रकरणात ज्यांची बदनामी झाल्याचा आरोप आहे, त्यांनी तक्रार केली नाही आणि ज्यांनी तक्रार केली आहे, त्यांची बदनामी झाल्याचं म्हटलं नाही. त्यामुळे अशा प्रकारे गुन्हा दाखल करणं हा सत्तेचा गैरवापर आहे. अशा प्रकारचा गुन्हा दाखल करताना कोणताही तपास करण्यात आला नाही. या प्रकरणात प्राथमिक चौकशी देखील करण्यात आली नाही”, असं कामराचे वकील म्हणाले.
युक्तीवादादरम्यान त्यांनी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्या वक्तव्याचाही उल्लेख केला. “उद्धव ठाकरे यांनी 2024 च्या निवडणूक प्रचारात एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘गद्दार’ म्हणून केला होता. 2023 मध्ये अजित पवार यांनीही गद्दारांना धडा शिकवला जाईल, असं भाष्य केलं होतं. पण त्यांच्याविरोधात कोणी तक्रार केली नाही. तुम्ही जर सार्वजनिक क्षेत्रात काम करत असाल तर तुमच्यावर टीका होणारच. मात्र तुम्ही कोणाच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू शकत नाही. या प्रकरणात जे प्रेक्षक कार्यक्रमाला गेले होते, त्यांनादेखील चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली”, असं वकिलांनी नमूद केलं.
विडंबनात्मक गाण्याबद्दल कुणालला ज्या धमक्या मिळाल्या, त्यांचाही उल्लेख वकिलांनी युक्तीवादारम्यान केला. ते म्हणाले, “ज्या ठिकाणी कार्यक्रम झाला, त्या स्टुडिओचा काही भाग तोडण्यात आला. कुणाल कामराला अनेक राजकीय नेत्यांनी धमक्या दिल्या आहेत. या प्रकरणात पोलीस कामराला प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात उपस्थित राहून जबाब नोंदविण्यास समन्स पाठवत आहेत. परंतु कामरा पहिल्या दिवसापासून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्यास तयार आहे. त्याने याबाबत पोलिसांना वेळोवेळी कळवलं आहे. कुणालला जवळपास 500 पेक्षा जास्त धमक्या दिल्याच्या बातम्या मीडियामध्ये आल्या आहेत. मुरजी पटेल यांनी खुलेआम पोस्टर लावून कामराला एकनाथ शिंदे यांची माफी मागण्यास अल्टीमेंटम दिला होता. तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी असल्या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत, असा इशारा दिला. शिवसेनेचे राहुल कनाल यांनी कामराचं मुंबईत शिवसेना स्टाइलमध्ये स्वागत केलं जाणार, अशी धमकी दिली. सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील पोलिसांनी कामराला पकडून त्याच्या आयुष्याची कॉमेडी करायला हवी असं वक्तव्य केलं होतं.”
“कुणाल कामराने फक्त त्याची मतं व्यक्त केली आहेत. शिवसेनेत जे काही घडलं त्याची इतिहासात नोंद आहे. त्याला मिळणाऱ्या धमक्यांबद्दल पोलिसांना माहीत असतानाही ते आम्हाला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवत आहेत. कामराला मिळणाऱ्या धमक्या लक्षात घेऊन त्याला अंतरिम दिलासा द्यावा. अजित पवारांनी तर सगळ्यांबद्दल गद्दार असं वक्तव्य केलं होतं. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारचादेखील त्यांनी गद्दार असा उल्लेख केला होता. पूर्ण निवडणूक या मुद्द्यावर लढवली गेली होती. महाविकास आघाडीने गद्दारांचा पंचनामा अशी घोषणा दिली होती. गद्दाराच्या पंचनामामध्ये महायुतीतील तिन्ही पक्षांचा समावेश होता,” असा युक्तीवाद कामराच्या वकिलांनी केला.
“आमच्याविरोधात बोलाल तर सोडणार नाही, अशा धमक्या कुणालला दिल्या आहेत. धमक्या देण्याची ही कोणती पद्धत आहे? हे खरोखर कायद्याचं राज्य आहे का? अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं काही महत्त्व आहे की नाही? जर चूक झाली असेल तर कायद्याच्या आधारे त्याविरोधात कारवाई करता येत नाही का? स्वतःच्या सत्तेच्या ताकदीच्या आधारावर, हवे तसे कलम लावून FIR दाखल केली जाते का?”, असा सवाल वकिलांनी केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List