“मला मागून स्पर्श..”; लोकल ट्रेनमध्ये अभिनेत्यासोबत घडला धक्कादायक प्रकार
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आमिर अलीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला. वयाच्या चौदाव्या वर्षी लैंगिक छळ झाल्याचा खुलासा त्याने केला. या घटनेमुळे त्याला खूप मोठा मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर त्याने मुंबई लोकलमधून प्रवास करणंच थांबवलं होतं. या घटनेमुळे इतर पुरुषांकडे लैंगिकदृष्ट्या आकर्षित होणाऱ्या पुरुषांबद्दल त्याच्या मनात वाईट विचार निर्माण झाल्याचं आमिरने सांगितलं. परंतु, जसजसा तो मोठा होत गेला, तसतसं त्याला जाणवलं की किशोरवयात असताना आलेल्या एका वाईट अनुभवामुळे आपण सर्व समलिंगी पुरुषांना एकाच दृष्टीकोनातून पाहू नये.
‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत आमिरला त्याच्या समलिंगी मित्रांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला, “मी पहिल्यांदा ट्रेनने प्रवास करत होतो आणि त्यानंतर मी पुन्हा कधीच ट्रेनने प्रवास केला नाही. कारण मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यात आला होता. त्यावेळी मी 14 वर्षांचा होता. त्या घटनेनंतर मी मागच्या बाजूने माझी बॅग घट्ट पकडू लागलो होतो. मग एकेदिवशी कोणीतरी माझ्या बॅगेतून पुस्तकं चोरली. पुस्तकं कोण चोरतं असा प्रश्न मला पडला होता आणि त्यानंतर मी पुन्हा कधीच ट्रेनने प्रवास न करण्याचा निर्णय घेतला.”
आमिर अलीने पुढे सांगितलं की जेव्हा काही मित्रांनी त्याला काही गोष्टी समजावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला याची जाणीव झाली की आपल्या भूतकाळातील अनुभवामुळे आपण प्रत्येकाला एकाच चष्म्यातून बघू नये. “माझ्याच मित्रांपैकी काहींनी माझ्याकडे मन मोकळं केलं होतं की ते पुरुषांकडे आकर्षित होतात. मी त्यांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. ते माझ्या भावंडांसारखे आहेत. त्यांच्यासोबत मी एकाच बेडवर झोपू शकतो. जेव्हा त्यांनी माझ्याकडे हा खुलासा केला तेव्हा मला वाटलं की माझ्या काही अनुभवांमुळे मी संपूर्ण जगाला चुकीचा समजत होतो. जेव्हा तुम्ही मोठे होता, तेव्हा तुम्हाला हळूहळू गोष्टी समजू लागतात आणि तुमचे विचार बदलतात”, असं तो म्हणाला.
आमिर अलीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास, त्याने अभिनेत्री संजीदा शेखशी लग्न केलं होतं. या दोघांना सहा वर्षांची मुलगी असून आर्या असं तिचं नाव आहे. काही महिन्यांपूर्वीच या दोघांनी घटस्फोट घेतला. संजीदाला घटस्फोट दिल्यानंतर आमिर सध्या अंकिता कुकरेतीला डेट करतोय.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List