काय फालतू बॅटिंग केली ना आम्ही, KKR vs PBKS सामन्यानंतर दोन मुंबईकरांमधील संवादाचा व्हिडीओ व्हायरल
पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघांमध्ये मंगळवारी रोमहर्षक सामना रंगला. या लढतीत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्सने अवघ्या 112 धावांचा बचाव करत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला पराभवाचा धक्का दिला. रथी-महारथींचा भरणा असलेल्या कोलकाताचा संपूर्ण संघ 95 धावांमध्ये गारद झाला आणि पंजाबने 16 धावांनी विजय मिळवला. या लढतीनंतर दोन मुंबईकर कर्णधारांमधील संवादाचा व्हिडीओ समोर आला आहे.
सामना संपल्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू हस्तांदोलन करत होते. याचवेळी दोन्ही संघाच्या कर्णधारांनीही एकमेकांशी हस्तांदोलन केले. यावेळी अजिंक्य रहाणे याने श्रेयस अय्यर याच्याशी मराठीत संवाद साधत ‘काय फालतू बॅटिंग केली ना आम्ही!’, असे म्हटले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, या लढतीनंतर कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणे चांगलाच नाराज झाला. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत आता बोलण्यासारखे काही राहिले नाही आणि आपली विकेट सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरली असेही तो म्हणाला. तसेच आम्ही खूप वाईट फलंदाजी केली आणि मी एक चुकीचा फटका खेळला असे म्हणत रहाणेने या पराभवाची जबाबदारी स्वीकारली.
…तर रहाणे बाद झाला नसता
पंजाबने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अंगक्रिश रघुवंशीने अर्धशतकीय भागिदारी केली. सामना कोलकाताच्या बाजुने झुकला असे वाटत असतानाच रहाणे युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू झाला. रिप्लेमध्ये हा चेंडू स्टंपच्या लागत नसल्याचे दिसले. मात्र रहाणेने डीआरएस घेतला नव्हता, त्याने डीआरएस घेतला असता तर तो नाबाद राहिला असता आणि कदाचित सामन्याचा निकालही वेगळा लागला असता.
याबाबतही रहाणेने भाष्य केले. चहलचा चेंडू स्टंपला सोडून जाईल याची मला खात्री नव्हती. मात्र माझ्या विकेटनंतरच सामन्याला कलाटणी मिळाली. त्यावेळी कुणीही जोखीम घ्यायला तयार नव्हते, मलाही चेंडू स्टंपला लागणार नाही याची खात्री नव्हती. त्यामुळे मी डीआरएस घेतला नाही, असे रहाणे म्हणाला.
मुल्लानपूरला चहलचा कहर, पंजाबचा कोलकात्यावर 16 धावांनी सनसनाटी विजय
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List