नाशिकमध्ये आज शिवसेनेच्या एकजुटीचा महानिर्धार, उद्धव ठाकरे यांचे प्रमुख मार्गदर्शन
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ उद्या नाशिकमध्ये धडाडणार आहे. नाशिकच्या गोविंदनगर येथील मनोहर गार्डन सभागृहात शिवसेनेचे निर्धार शिबीर होणार आहे. त्यात उद्धव ठाकरे नाशिकमधील तमाम शिवसैनिक आणि पदाधिकाऱयांना मार्गदर्शन करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी नाशिक नगरी भगवामय झाली आहे. आज नाशिक शहरामध्ये शिवसैनिक आणि युवासैनिकांनी भव्य बाईक रॅली काढून वातावरणातील उत्साहात भर घातली. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन होणार आहे. धगधगत्या मुद्दय़ांवर चर्चासत्रेही या शिबिरात होणार आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर हे शिबीर होत असल्याने या ‘निर्धार’ शिबिराला मोठे महत्त्व आहे. उद्धव ठाकरे सायंकाळी 5.30 वाजता प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी 5 वाजता शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांचे भाषण होणार आहे. या शिबिरासाठी संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शिवसैनिकांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या शिबिराला शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांसह, उपनेते, सचिव, पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने शिवसैनिक दाखल होणार आहेत. यामध्ये महिला रणरागिणींची संख्याही मोठी राहणार आहे. उद्धव ठाकरे कोणती भूमिका मांडतात याविषयी औत्सुक्य आहे.
भगव्याचे तेज, शिवसैनिकांची निष्ठा
शिवसेनेच्या महानिर्धार शिबिराच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये जागोजागी भगवे झेंडे, कमानी डौलाने फडकत आहेत. यामुळे गोविंद नगरचा मनोहर गार्डन परिसर भगवामय झाला आहे. उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर निष्ठावंत शिवसैनिकांकडून लावण्यात आले आहेत. भगवेमय झालेले मनोहर गार्डन व परिसर, भगव्या कमानी लक्ष वेधून घेत आहेत. शहरातील चौक, रस्ते भगव्या झेंडय़ांनी सजले आहेत.
बाईक रॅलीमुळे भगवा झंझावात
शिबिराच्या पूर्वसंध्येला शालीमार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी शेकडोंच्या संख्येने निष्ठावंत शिवसैनिक, महिला पदाधिकाऱयांनीही सहभागी होत शिवसेनेचा जयघोष केला. ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘शिवसेना झिंदाबाद’, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. गोविंदनगर येथील शिबीरस्थळी या रॅलीची सांगता झाली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List