पोलीस डायरी – मास्टर माइंड हेडलीच! राणा हा फुटकळ कच्चा लिंबू !

पोलीस डायरी – मास्टर माइंड हेडलीच! राणा हा फुटकळ कच्चा लिंबू !

>> प्रभाकर पवार

17 वर्षांपूर्वी (26/11) मुंबईवरील हल्ल्यात सहभागी असलेला दहशतवादी तहब्बूर हुसेन राणा (64 वर्षे) यास अमेरिकेने 10 एप्रिल 2025 रोजी भारताच्या स्वाधीन केले परंतु या हल्ल्याचा खरा मास्टर माइंड डेव्हिड कोलमन हेडली ऊर्फ दाऊद (64 वर्षे) यास मात्र अमेरिकेने आपल्याकडेच ठेवून घेतले आहे. राणा हा पाकिस्तानी लष्करात डॉक्टर होता. डेव्हिड हेडली याचा जन्म जरी अमेरिकेत झालेला असला तरी त्याचे वडील पाकिस्तानी नागरिक होते, तर आई अमेरिकन होती. परंतु हेडली पाकिस्तानातच वाढला. ड्रग्जची तस्करी करू लागला. लष्कर-ए-तोयबाशी संबंध आल्याने तो कट्टर मुस्लिम दहशतवादी बनला. लष्कर-ए-तोयबाशी संबंधित राणाला हेडलीने भारतात पाठविले होते. दक्षिण मुंबईतील ताडदेव येथे राणाने अमेरिकन व्हिसा सेंटरही उघडले होते. परंतु त्यात तो यशस्वी झाला नाही.

26/11 ला मुंबईत हल्ला घडविण्यात आला. त्यानंतर वर्षभराने पाकिस्तानला जात असताना हेडली व राणाला शिकागोमधील विमानतळावर 2009 साली अटक करण्यात आली. तेव्हापासून अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या या दोघांपैकी अमेरिकेने फक्त राणाला भारताच्या स्वाधीन केले आहे. कारण का. तर तो किरकोळ गुन्हेगार आहे. 26/11 चा मास्टर माइंड मात्र हेडली हाच आहे. तो पाकिस्तानच्या आयएसआयप्रमाणे अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांसाठी काम करीत होता. अशा या डबल एजंटाकडे भारताविरुद्धच्या कटकारस्थानांची बरीच रहस्ये दडलेली आहेत. बॉम्बस्फोट, हल्ले घडवून आणणाऱ्या हेडलीला अमेरिकेच्या न्यायालयाने 35 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. मग भारत हेडलीला (कसाबप्रमाणे) फासावर लटकविण्यासाठी का प्रयत्न करीत नाही?

राणासारख्या लिंबूटिंबू आरोपीला भारतात आणून भारत सरकार राणा ही मोठी फलश्रुती समजत आहे का? राणा हा भारतासाठी कच्चा लिंबू आहे, असे गुप्तचर अधिकारीच सांगत आहेत. भारताला राणा नव्हे, तर हेडली हवा आहे हे लक्षात ठेवा.

डेव्हिड कोलमन हेडली ऊर्फ दाऊद सय्यद गिलानी हा दाऊद इब्राहिमपेक्षाही बडा खतरनाक अतिरेकी आहे. त्याला जोपर्यंत भारतात आणून फाशी दिली जाणार नाही, तोपर्यंत 170 शहीद भारतीयांच्या नातेवाईकांना शांती लाभणार नाही. 170 मध्ये एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, शशांक चंद्रसेन शिंदे या मुंबईच्या पोलीस अधिकाऱ्यांसह 18 सुरक्षा अधिकारी व कर्मचारी 26/11 च्या हल्ल्यात अतिरेक्यांकडून मारले गेले आहेत शिवसेनाप्रमुखांचे वांद्रे येथील ‘मातोश्री’ व प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर, अगदी शिवाजी पार्कजवळील शिवसेना भवनातही डेव्हिड हेडली ऊर्फ दाऊद पोहोचला होता. त्याने आतून-बाहेरून शिवसेना भवनाची रेकी केली होती. तुकाराम ओंबळे यांनी कसाबला जर जिवंत पकडले नसते तर या हल्ल्यामागे पाकिस्तान आहे. हेडली आहे हे कधी जगाला कळलेच नसते. त्यामुळे आपला जीव धोक्यात घालून कसाबला पकडणाऱ्या संजय गोविलकर, योगेश कदम या जखमी पोलीस अधिकाऱ्यांचेही कौतुक करावे तितके कमी आहे.

कसाबनंतर मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी मुंबईच्या गोरेगाव (प.) येथील मोतीलाल नगरात राहणाऱ्या फईम अन्सारी (35 वर्षे) व बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात राहणाऱ्या सबाउद्दीन अहमद शेख (24) अशा दोघा भारतीयांना पाकिस्तानी अतिरेक्यांना मदत केल्याच्या आरोपावरून अटक केली त्यानंतर बीडच्या अबू जिंदाल याला ताब्यात घेतले, तर पाकिस्तानातील माजी लष्करी अधिकाऱ्यांसह 35 जणांना फरार घोषित केले.

त्यापैकी सात जणांना पाकिस्तानने अटक केली, तर मुंबईवरील हल्ल्यातील खऱ्या मास्टर माइंडना अभय दिले. डेव्हिड हेडलीने राणाला भारतात एकदाच पाठविले होते. तर स्वतः डेव्हिड हेडली आठ वेळा मुंबईत येऊन गेला होता. हेडली दक्षिण मुंबईच्या गावदेवी येथे एका आलिशान घरात भाड्याने राहत होता. भाड्याच्या घरात राहून हेडलीने मुंबईवर 26/11 रोजी हल्ला घडवून आणला. तो खतरनाक अतिरेकी भारताच्या ताब्यात मिळू नये यासारखी शोकांतिका नाही. शिवसेना भवनाची रेकी करणाऱ्या डेव्हिडला शिवसेनाप्रमुखांपर्यंत पोहोचायचे होते, परंतु भारतीयांच्या सुदैवाने ते त्याला शक्य झाले नाही. त्यामुळे संभाव्य धोका टळला. राणा हा भारताच्या दृष्टीने किरकोळ आरोपी आहे. 100 च्यावर खुनांचा संशय असलेला ‘आका’ बीडमध्ये पकडला गेला. परंतु त्या आकाच्या आकाचा बालही बाका झाला नाही. 26/11 चा मास्टर माइंड हेडलीचेही तेच झाले आहे. हेडलीला भारताविरुद्ध वापरणारी अमेरिका हेडलीला कधीच भारताच्या ताब्यात देणार नाही. भारतही अमेरिकेशी पंगा घेणार नाही. हेडली भारताच्या ताब्यात आल्यास अमेरिकेची भारताविरुद्धची बरीच कट-कारस्थाने बाहेर येतील. त्यामुळेच अमेरिकेने (Plea bargaining) च्या नावाखाली हेडलीबरोबर सौदेबाजी केली आहे. त्याला शिक्षेत सूट दिली आहे.

आठ वेळा भारतात येऊन हेडलीने योजनाबद्ध पद्धतीने मुंबईत हल्ला घडवून आणला त्याची आठवण झाली की, अंगावर काटा उभा राहतो. आज त्या घटनेला दीड तपापेक्षाही अधिक काळ लोटून गेला आहे. तरीही आपल्या देशाच्या सुरक्षिततेत वाढ करण्यात आलेली नाही. पाकिस्तानी अतिरेकी समुद्रमार्गे मुंबईत घुसून कधीही हल्ला करू शकतात. मुंबईच्या सागरी सीमा आजही उघड्या आहेत. सागरी पोलिसांना आधुनिक गस्ती नौका देण्यात आलेल्या नाहीत. दिल्या आहेत त्या नादुरुस्त आहेत. त्यांना वेगच नाही. खोल समुद्रात. हवामानात चालविण्यासाठी त्या अयोग्य आहेत. गस्ती नौकेला नेमण्यात येणारे पोलीस अंमलदारही थकलेले, बोटीत चढताही येत नाही असे नेमले जातात. मग अशा वेळी आपल्या सागरी सीमा कशा सुरक्षित राहतील?

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठा निर्णय ! पुनर्विकास प्रकल्पात असहकार पुकारणाऱ्या धारावीकरांना मुदतवाढ नाही मोठा निर्णय ! पुनर्विकास प्रकल्पात असहकार पुकारणाऱ्या धारावीकरांना मुदतवाढ नाही
धारावी पुनर्विकास प्रकल्प सध्या वेगाने सुरू आहे. मात्र धारावी पुनर्विकास प्रकल्पात सहभागी होण्यासाठी 15 एप्रिल 2025 पर्यंत सादर केलेल्या कागदपत्रांची...
आगीचे लोळ होरपळवणार, पण अजून येणार मोठं अस्मानी संकट, आता होणार कहर, IMD चा इशारा काय?
‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठिशी..’; महेश मांजरेकरांनी सलमानला म्हटलं ‘देवमाणूस’
‘माझे तिच्या एवढेही मोठे नाहीयेत…’; नीना गुप्तांची प्रसिद्ध अभिनेत्रीवर थेट कमेंट, सर्वांनी केले कान बंद
‘फुले’ चित्रपटाच्या वादावर राज ठाकरेंची भूमिका काय? ट्रेलर पाहून म्हणाले..
बेकायदा पिस्तूल बागळणाऱ्या दोघांना साताऱ्यात अटक
कार्य कोणतेही असो, ‘बिचुकले’त दिला जातो पर्यावरणाचा संदेश; गावाची पंचक्रोशीत होतेय चर्चा