‘अमित अंकल’नी सांगितलं माझे वडीलच CM पदाचा चेहरा असणार! नितीश कुमार यांच्या मुलाचा दावा
बिहारमध्ये याच वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी राजकीय हालचालींना वेग आला असून महाआघाडीनमधील नेत्यांच्या दिल्लीमध्ये बैठकांवर बैठका होत आहेत, तर दुसरीकडे एनडीएनेही रणनीती बनवण्यास सुरुवात केली आहे.
आगामी निवडणुकीत एनडीएचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. जनता दलचे (यूनायटेड) अध्यक्ष व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे मानसिक आरोग्य ठीक नसल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळणार नसल्याचे दावेही केले जात आहेत. अशातच नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांनी मोठा दावा केला आहे. ‘अमित अंकल’ यांनी सांगितले की माझे वडीलच आगामी निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार आहेत, असे विधान निशांत कुमार यांनी माध्यमांशी बोलताना केले.
‘माझे वडील 100 टक्के तंदुरुस्त आहेत. बिहारमध्ये एनडीए सरकार स्थापन करेल. अमित शहा अंकल यांनी सांगितले की माझे वडीलच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील’, असे निशांत कुमार म्हणाले. तसेच नितीश कुमार निःसंशयपणे मुख्यमंत्री होतील आणि 2010 ला जदयूला जसे बहुमत दिले, तसे यावेळीही द्या, असे आवाहनही त्याने बिहारच्या नागरिकांना केले.
Bihar: “Nitish Kumar will undoubtedly become CM” after assembly polls, JDU’s Nishant Kumar
Read @ANI Story | https://t.co/rE1QT2dkSH#NitishKumar #JDU #Bihar pic.twitter.com/2thbYgD2Ku
— ANI Digital (@ani_digital) April 15, 2025
दरम्यान, याआधी बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनीही विधानसभा निवडणुकीनंतर नितीश कुमार हेच मुख्यमंत्री पदावर कायम राहतील असे विधान केले होते. एनडीएपुढे कोणतेही आव्हान नसल्याचेही ते म्हणाले होते. पाटणा येथे ते पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यानंतर आता नितीश कुमार यांचा मुलगा निशांत कुमार यानेही अशाच प्रकारचे विधान केले आहे.
तत्पूर्वी दिल्लीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाची जागावाटपासंदर्भात एक बैठक पार पडली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर खरगे यांनी बिहारमध्ये यावेळी बदल होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. बिहारमधील शेतकरी, कामगार, महिला, मागासवर्गीय आणि समाजातील इतर सर्वच घटकातील लोकांना महाआघाडीचीचे सरकार हवे आहे, असेही काँग्रेस अध्यक्ष यावेळी म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List