शिवसेनेला घाबरलेल्या सरकारची मुहूर्त पाहून नाशकात कारवाई, पण निर्धार शिबिर यशस्वी होणार! संजय राऊत
नाशिकमधील आजचं शिबीर हे हातात कुठलीही हातात सत्ता नसताना होत आहे असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच शिवसेनेला घाबरलेल्या सरकारने मुहूर्त पाहून नाशिकमध्ये बेकायदेशीर दर्ग्यांवर कारवाई केली, असे असले तरी निर्धार शिबिर यशस्वी होणार असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
नाशिकमध्ये संजय राऊत म्हणाले की, ज्यांना सत्तेच्या ऑक्सिजनशिवाय जगता येत नव्हतं ते पक्ष सोडून गेले. तिथे आता आम्ही त्यांना लाचारी आणि हुजरेगिरी करताना पाहतोय. पण आजही माननीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर श्रद्धा असलेला आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरती विश्वास असलेला खुप मोठा वर्ग आजही पक्षामध्ये आहे. काही लोक कुंपणावर असतात, ते इकडे तिकडे उड्या मारत असतात. आजचं शिबीर हे त्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रात ज्या प्रकारचं वातावरण आहे ते पाहता या राज्याची जनतासुद्धा अस्वस्थ आहेत. ज्या प्रकारे राज्यात सत्तापरिवर्तन झाले आहे त्याच्याशी जनता सहमत नाही. आम्हाला जनतेला सोबत घ्यायचे आहे. निवडणुका इतक्यात नाहियेत. त्यामुळे हे शिबीर निवडणुकांसाठी आहे असे नाही. निवडणुका नसताना पक्ष बांधणीसाठी हे प्रयत्न सुरू आहे. आजचं शिबीर हे हातात कुठलीही हातात सत्ता नसताना होत आहे. असंख्य अडथळे या शिबिरात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. तरीही आमच्या पदाधिकाऱ्यांनी हे शिबीर यशस्वी केलं असेही संजय राऊत म्हणाले.
भाजपला कमळाबाई हे नाव बाळासाहेबांनी ठेवलं आहे. हे नाव तेव्हा आमच्यासारख्या मुलांनी ठेवलं नव्हतं. आपल्याकडे बारशाला कानात नाव सांगण्याचीपद्धत आहे. तेव्हा बाळासाहेबांनी भर सभेत कमळाबाई हे नाव जाहीर केलं होतं. बाळासाहेब द्रष्टे होते. त्यांनी कमळाबाई हे नाव योग्य ठेवले आहे. आणि शिवसेनाप्रमुखांच्या नावाने कमळाबाईचे नाव आलं तर कुणाला आक्षेप घेण्याचे कारण नाही. यात चुकीचे काही नाही, सगुणाबाई असतं, सुगंधाबाई असतं तसं कमळाबाई असतं असे संजय राऊत म्हणाले.
अजूनही शिवसेनेची दहशत आहे, भिती आहे. आज मला सांगितलं की नाशिकमध्ये दर्गे हटाव मोहीम सुरू केली आहे. गोंधळ निर्माण व्हावा म्हणून आजचाच दिवस निवडला. आज या शिबिराचं लक्ष दुसरीकडे जावं म्हणून दर्गा आणि मशिदींवर बुलडोझर चालवले. हे कसलं लक्षण आहे? हिंमत असेल तर समोर येऊन लढा आमची तयारी आहे. तुम्हाला वातावारण नासवायचं आहे. पण ज्यांना देशच तोडायचा आहे त्यांनी दर्गे तोडले त्याचे आश्चर्य वाटायचं कारण नाही. त्यांना नंतरही कारवाई करता आली असती, पण आजचाच दिवस निवडला. म्हणजे तुम्ही जळताय तुम्ही जळू आहात, तुम्ही डरपोक आहात. तुम्हाला आमच्या अस्तित्वाची आणि सावलीचीही भिती वाटते. म्हणून तुम्ही हे फालतू उद्योग आणि नसती उठाठेव करत आहात. त्यामुळे या शिबीरावर काहीही परिणाम होणार नाही. शिबीराच्या ठिकाणी मनोहर गार्डनला जाऊन पहाल तर रांगा लागलेल्या आहेत. तिथे अगदी व्यवस्थित शिबिर सुरू आहे. तुम्ही दर्ग्यावरती बुलडोजर टाका, मशिदीवर टाका अजून काही करा आमचे लोक विचलित होणार नाहीत असे संजय राऊत यांनी सांगितले. 15 दिवसांपासूनच आजचा मुहूर्त काढला होता. भारतीय जनता पक्षाचे लोक या बाबतीमध्ये त्यांचा कोणी हात धरू शकणार नाही. ते मुहूर्त आधी काढत बसतात कधी कुठे दंगल घडवायचे कधी कुठे काय करायचे कधी कोणावरती कारवाई करायचे त्याचेच मुहूर्त काढून लोक बसलेले असतात.
जे बेकायदेशीर आहे त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. पण आमचा प्रश्न आहे तो मुहूर्तावर. या शहरामध्ये एक महत्त्वाचा राजकीय कार्यक्रम होतो आहे आणि तो हिंदुत्वाच्या संदर्भात होतो. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा कार्यक्रम होतोय. म्हणजे तुमच्या मनामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी पोटशूळ आहे, की आजचा दिवस डिस्टर्ब करायचा, उद्ध्वस्त करायचा, लोकांमध्ये भीती निर्माण करायची. ही कारवाई त्यांना उद्याही करता आली असती. आजची मध्य रात्री सुद्धा तुम्हाला ही कारवाई करता आली असती. पण शिबिराला गालबोट लावण्यासाठी त्यांनी ही कारवाई केली आहे. हे लोक घाबरलेले. सगळे घाबरून पळून गेलेले डरपोक लोक. एवढी तोडफोड करून, माणसं विकत घेऊनही हजारोंच्या संख्येने हे शिवसैनिक जमतात कसे हे त्यांना पहातवत नाही. पक्षाचे अशा प्रकारचे भव्य कार्यक्रम होतात कसे या चिंतेने ते अस्वस्थ आहेत असेही संजय राऊत म्हणाले.
अमित शहा हे एकनाथ शिंदे यांचे पक्षप्रमुख आहेत. आम्ही आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांना भेटतो. अमित शहा हे महाराष्ट्रात एकूण तीन पक्ष चालवतात. जवळजवळ भारतीय जनता पक्ष अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यानंतर हा एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष आहे त्या तीन पक्षाचे प्रमुख आहेत. हा फार मोठा विक्रम आहे की तीन पक्षांचा प्रमुख आणि अधूनमधून तर आमदास आठवल्यांचा पक्ष चालवतात. त्यांना रिपोर्टिंग करावच लागतं. आता राज ठाकरे यांचा पक्षाविषयी मी का फार सांगू शकत नाही पण त्यांचा पक्ष सुद्धा त्यांचा मित्र पक्षच आहे आणि त्यांची ध्येयधोरणं काय असावी ते सुद्धा दिल्लीतूनच ठरतं. अजित पवार यांची तक्रार घेऊन अमित शहांकडे म्हणजे त्यांच्या पक्षप्रमुखांकडे स्वतः एकनाथ शिंदे गेले होते ते पण विसरता येत नाही असे संजय राऊत म्हणाले.
उदय सामतांना विचारा की तुम्ही शिवसेनेत कधी आला होता? उदय सामंत यांना विचारा तुम्ही जे बाळासाहेब, बाळासाहेब, शिवसेना, शिवसेना करता, तुम्ही किती पक्ष बदलून आलात. मूळ शिवसेनेमध्ये कधी आला होतात आणि का आला होतात? महाराष्ट्र घडवण्यासाठी वगैरे अशा फार मोठ्या उदात्त हेतूने आला होतात का? नाही ना. तुम्ही व्यापारी आहात तुम्ही पैसे कमवायला आलात. सत्ता गेली उद्योग करायला तुम्ही तिकडे गेलात. तुम्हाला शिवसेना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल तुम्हाला काय माहित आहे. तुम्ही शरद पवारांचे झाला नाहीत. ज्या पवारांनी तुम्हाला राजकीय दृष्ट्या घडवलं, तुम्ही आमचे काय होणार. उदय सामंत यांच्यासारख्या उद्योजक राजकारण्यांनी बाळासाहेब ठाकरेंवर न बोलले बरं .
ज्यांच्यावरती इडीने चार्शीट दाखल केले होते ते सगळे भारतीय जनता पक्षामध्ये आहेत, मी सोडून. ज्यांच्यावरती इडीने चार्जशीट दाखल केले होते आणि ज्यांच्या संपत्त्याही जप्त केल्या होत्या. ते सगळे भारतीय जनता पक्षामध्ये मंत्रीपदावर किंवा आमदार खासदार अशा पदांवर काही ठिकाणी मुख्यमंत्री पदावर आहेत. आसाम मध्ये पंडित नेहरू यांनी स्थापन केलेली एक संस्था नॅशनल हेराल्डच्या संदर्भात काही व्यवहार झाले होते, त्या संदर्भातही त्यांनी पंडित नेहरूंची संपत्ती जप्त केली होती. दाऊद इब्राहीम आणि इकबाल मिरचीची संपत्ती सरकारने मुक्त केली असे संजय राऊत म्हणाले. तसेच हे मी नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीरपणे सांगत होते. या देशामध्ये दाऊदला, इक्बाल मिरचीला अभय आहे. पण नॅशनल हेराल्डवर जप्ती आणली. आमच्या समोर कोणीतरी विरोधक म्हणून उभा आहे आणि आम्हाला प्रश्न विचारतो हे त्यांना सहनच होत नाही, यालाच हुकुमशाही म्हणतात. हिटलर, इदी आमीन, स्टालिन हेच करत होता, आमच्या देशात वेगळं काय चाललंय असेही संजय राऊत म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List