दीड हजार पोलिसांच्या फौजफाट्यातून चोरट्यांनी पळविली 13 मंगळसूत्रे; 10 दुचाकीसह 33 मोबाईल लंपास
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शहरातील मुख्य मिरवणुकीत चोरट्यांनी तब्बल 13 मंगळसूत्रे, 10 दुचाकी आणि 33 मोबाईल लंपास करून पोलिसांना खुले आव्हान दिले. या मिरवणुकीत जवळपास दीडशे पोलीस अधिकारी अंमलदार बंदोबस्ताला असूनदेखील या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
शहरातील घरफोड्या, दुचाकी चोरी, लूटमारी, मंगळसूत्रे हिसकवण्याच्या घटना राजरोसपणे घडत आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखा अपयशी ठरत आहेत. या चोरट्यांनी आता थेट महापुरुषांच्या जयंती मिरवणुकीत शिरकाव करून पोलिसांना खुले आव्हान दिले आहे. मिरवणुकीच्या गर्दीचा फायदा या चोरट्यांनी घेतला असून, त्याला अटकाव करण्यात पोलीस आयुक्तालयातील पोलीस अपयशी ठरले. त्यामुळे मिरवणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात मंगळसूत्रे हिसकावण्याचे प्रकार समोर आले आहेत.
क्रांतीचौक येथून सुरुवात झालेल्या या मिरवणुकीच्या गर्दीत घुसून चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील 13 मंगळसूत्रे हिसकावली तसेच 9 दुचाकी व 31 मोबाईल असा मुद्देमाल क्रांतीचौक पोलीस ठाण्यातून लंपास केला. या प्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच 32 मंडळांसह व डीजेचालकांवर डेसिबलचा नियम तोडून आवाज वाढविल्याप्रकरणी पोलीस अंमलदार रामदास देवराव ठोकळ यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच गुरुगोविंदसिंगपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरट्यांनी 1 दुचाकी 2 मोबाईल लंपास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस बंदोबस्ताचे काय?
शहरातील मुख्य मिरवणुकीसह वेगवेगळ्या भागात बंदोबस्त लावण्यात आला होता. मुख्य मिरवणुकीसाठी क्रांतीचौक परिसरात 1518 पोलीस अधिकारी, अंमलदारांचा बंदोबस्त ठेवला होता. तसेच मिरवणुकीत काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी 17 कॅमेरे तैनात करण्यात आले होते. तसेच 33 पोलीस निरीक्षक 99 स.पो. नि., पीएसआय, 1206 पोलीस अंमलदार व 180 महिला पोलीस अंमलदारांच्या तगड्या बंदोबस्ताच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली जात आहे.
तरुणीची छेडछाड, पोलिसांना धक्काबुक्की
मिरवणुकीत आलेल्या एका तरुणीची काही टवाळखोरांनी छेड काढली होती. या टवाळखोरांच्या शोधार्थ गर्दीत गेलेल्या पोलिसांनाही धक्काबुक्की केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दीपक उत्तम दाभाडे (38), अजय भीमराव काकडे (32, दोघेही रा. नागसेननगर) या दोघांवर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. हा प्रकार सोमवारी रात्री 11 वाजता क्रांती चौकाजवळील कदीम मस्जिदजवळ घडला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List