अलिबागच्या फुटाणे रुग्णालयात प्रसूतीनंतर मातेचा तडफडून मृत्यू, हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
प्रसूतीनंतर काही तासांतच मातेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अलिबागच्या फुटाणे रुग्णालयात घडली आहे. मात्र प्रसूतीनंतर प्रकृती बिघडूनही हॉस्पिटलने वेळीच लक्ष दिले नसल्याचे सांगत डॉक्टर व परिचारिकांच्या हलगर्जीपणामुळेच हा बळी गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी डॉक्टर व परिचारिकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी थळे कुटुंबीयांनी केली आहे.
अलिबाग तालुक्यातील घोटवडे सुचिता थळे यांना प्रसूतीसाठी शहरातील फुटाणे रुग्णालयात 14 एप्रिल रोजी दुपारी दाखल करण्यात आले होते. डॉ. अनिल फुटाणे यांनी सुचिता यांना तपासल्यानंतर त्यांच्या पोटातील पाणी कमी झाल्याने सिझर केले. त्यानंतर सुचिताने एका गोंडस बाळाला जन्म दिल्याने सर्वच आनंदीत होते. मात्र रात्री सुचिता हिच्या छातीत अचानक जळजळ होऊ लागली. याबाबत जाऊ आश्लेषा थळे यांनी तेथील परिचारिका यांना सांगून डॉक्टरांना बोलावण्याची वारंवार विनंती केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले. सकाळी सुचिता हिची तब्येत जास्तच बिघडल्याने सुचिता हिला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु तिचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जिल्हा रुग्णालयात तणाव
घटनेनंतर सुचिता हिचे नातेवाईक संतप्त झाले होते. जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला. दरम्यान सिझर केल्यानंतर बाळ व माता दोघांचीही प्रकृती ठीक होती. सकाळी तिला दम लागला. परिचारिकेने मला कळवल्यानंतर मी लागलीच येऊन उपचार सुरू केले. मात्र सुचिता ही उपचारांना दाद देत नसल्याने तिला जिल्हा रुग्णालयात पुढील उपचाराकरिता हलवण्यात आल्याची माहिती डॉ. अनिल फुटाणे यांनी दिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List