एसंशिने नालेसफाई नाही तिजोरी सफाई सुरू केलीय, आदित्य ठाकरे यांची टीका
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी सोमवारी वरळीतील रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजप व एसंसि गटाला फटकारले आहे. ”पावसाळा तोंडावर आला पण एसंशिने नालेसफाई नाही तर तिजोरी सफाई सुरू केली’, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
”रस्त्याच्या काँक्रिटीकरणात घोटाळा झाला आहे हे मी गेल्या दोन वर्षांपासून सांगतोय. आता पावसाळा तोंडावर आल्यावर, लोकं प्रश्न विचारायला लागल्यावर, संपूर्ण मुंबईला त्रास व्हायला लागल्यानंतर सगळेच आमदार बोलायला लागले आहेत. मधल्या काळात एसंशिने रस्त्याच्या पाहणीचे नाटक केले. पण आपण परिस्थिती पाहता आज ज्या रस्त्यावर आपण उभे आहोत हा नवीनच झालेला आहे. अक्षरश: चंद्रावर उभे आहोत असं वाटतंय. हा रस्ता पंधरा दिवसांपूर्वी झालाय व खड्डे पडलेयत. वारंवार याची तक्रार करूनही पालिका कोळीवाड्याकडे लक्ष देत नाहीय, रस्त्याचा भ्रष्टाचार खरा व डोळ्यादेखत आहे. कदाचित हे सगळं दाखवल्यावर पालिकेकडून अधिकाऱ्यांवर कारवाई होईल पण एसंशिंवर कधी कारवाई होणार? काँन्ट्रॅक्टरला अटक कधी होणार? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
”काँक्रिटीकरणाचे काही नियम असतात. छोट्या रस्त्यांवर काँक्रिटीकरण न करता असफॉल्ट मॅस्टिक केलं जातं. पण हा एक हावरटपणा आहे. ज्यांनी पैसे खाण्यासाठी, स्वत:चं दुकान चालवण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरचं दुकान सुरू केलं. मुंबई उपनगर पूर्ण बघा. जिथे काम झालंय तिथे काय दर्जाचं काम झालंय ते आपण स्वत: जाऊन बघा. काँक्रिट उडू लागलं आहे. काँक्रिटमध्येच आताच भेगा पडायला लागल्या आहेत. मी आताच आयुक्तांना सांगतोय की आताच पावसाळ्याआधीच्या बैठका घ्या. जिथे हे काँक्रिट अडकलंय ते बघा. पावसाळ्याची कामं झाली नाहीत. पोयसर नदी, मिठी नदीची काय हालत आहे. पावसाळ्याची काय तयारी करतायत हे भाजप आणि एशंसिवाले. एसंशिने नालेसफाई नाही तिजोरी सफाई सुरू केली आहे. यांनी निवडणूका आणि पक्ष फोडण्याचे सोडून कामावर लक्ष दिले तर मुंबईची खूप मदत होईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List